अमित पांघल, जस्मिन ऑलिम्पिकसाठी पात्र
दुसऱ्या वर्ल्ड पात्रता स्पर्धेत उपांत्य फेरी गाठत मिळविले यश
वृत्तसंस्था/ बँकॉक
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविलेला बॉक्सर अमित पांघल व महिलांमधील राष्ट्रीय चॅम्पियन जस्मिन लंबोरिया यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. येथे सुरू असलेल्या दुसऱ्या वर्ल्ड क्वालिफिकेशन बॉक्सिंग स्पर्धेत या दोघांनी उपांत्य फेरी गाठत ही पात्रता मिळविली.
पांघलने चीनच्या चुआंग लियुवर संघर्षपूर्ण विजय मिळविताना 5-0 अशी मात केली. तो दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला असून ऑलिम्पिक कोटा मिळविणारा तो पाचवा बॉक्सर आहे. महिलांच्या 57 किलो वजन गटात जस्मिनने मालीच्या मरिन कॅमाराचा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. भारताला 57 किलो गटात याआधीच ऑलिम्पिक कोटा मिळाला होता. पण परवीन हुडावर निलंबनाची कारवाई झाल्याने हा कोटा पुन्हा जस्मिनने मिळवून दिला. पांघल व जस्मिन यांच्याप्रमाणे निशांत देव (71 किलो गट), निखत झरीन (50 किलो), प्रीती पवार (54 किलो), लवलिना बोर्गोहेन (75 किलो) यांनीही ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे.
पांघलला ऑलिम्पिक कोटा मिळविण्याची ही एकच संधी मिळाली होती आणि त्याचा त्याने पुरेपूर लाभ उठविला. पांघलसाठी खूप अवघड परिस्थिती होती. बीएफआयच्या मूल्यमापनानुसार त्याला राष्ट्रीय संघातील स्थान गमवावे लागले आणि त्याच्या जागी दीपक भोरियाला स्थान मिळाले होते. दीपकने याआधीच्या दोन पात्रता फेरीत भाग घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकनंतर हरियाणाच्या पांघलने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात त्याने सुवर्णपदक जिंकले होते. यावर्षीच्या सुरुवातीस झालेल्या स्टँडजा मेमोरियल स्पर्धेतही त्याने जेतेपद पटकावले आहे.
पांघलला येथील उपांत्यपूर्व लढतीत पहिल्याच फेरीत संघर्ष करावा लागला. चिनी खेळाडूने उंचीचा लाभ घेत पांघलला काही ठोसे लगावले. उंची कमी असल्याने अमितला पुरेशी रीच मिळत नव्हती. तरीही त्याने काही ठोशांवर गुण मिळविले. पहिल्या फेरीत तो 1-4 असा पिछाडीवर पडला. अमितने नंतर डावपेचांत बदल केला आणि आक्रमणावर जोर देत दुसरी फेरी सुरू केली. चिनी खेळाडूनेही प्रतिआक्रमण करीत हल्ला केला. तरीही अमित आक्रमण कायम ठेवत काही पंचेस लगावले आणि ही फेरी जिंकली. शेवटच्या तीन मिनिटांत लियुनेही खेळात बदल केला आणि अमितच्या जवळ जाऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनीही एकमेकांवर जोरदार ठोसेबाजी केल्याने त्यांची बरीच दमछाक झाली. पण अखेरीत माजी जागतिक अग्रमानांकित अमितने विजय साकार केला. सचिन सिवाचची