For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक संघामध्ये आमीर, इमादचे पुनरागमन

06:21 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाक संघामध्ये आमीर  इमादचे पुनरागमन
Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील 18 एप्रिलपासून सूरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी पीसीबीने 17 जणांचा संघ जाहीर केला असून, त्यामध्ये मोहम्मद आमीर आणि इमाद वासीम यांचा समावेश करण्यात आला आहे. पाक संघामध्ये या दोन्ही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वासीम यापूर्वी निवृत्ती पत्करली होती. पण या दोन्ही क्रिकेटपटूंनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील तीन सामने रावळपिंडीत तर दोन सामने लाहोरमध्ये खेळविले जातील. 10 दिवसांच्या कालावधीची ही मालिका राहील.

Advertisement

पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याच्यावर स्पॉट फिक्सींगचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच या आरोपावरून त्याला काही काळ इंग्लंडमध्ये तुरुंगात राहावे लागले होते. आमीरने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2020 साली खेळला होता. प्रशिक्षक मिसबाह उल हक्क आणि वकार युनूस यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे मोहम्मद आमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. डावखुरा फिरकी गोलंदाज तसेच अष्टपैलू इमाद वासीमने 2023 च्या नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. दरम्यान पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत इमाद वासीमच्या शानदार कामगिरीमुळे त्याच्या संघाने जेतेपद मिळविल्याने पाकच्या निवड समितीने वासीमला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी मन वळविले. पाकच्या निवड समितीमध्ये मोहम्मद युसूफ, अब्दुल रझाक, असद शफीक, वहाब रियाज आणि बिलाल अफझल यांचा समावेश आहे. आमीर आणि इमाद यांच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसून आल्याने त्यांना पुन्हा संघात स्थान देण्यात आल्याचे निवड समिती सदस्यांनी सांगितले.

या मालिकेसाठी पाकचे नेतृत्व बाबर आझमकडे पुन्हा सोपविण्यात आले. सध्या पीसीबीचे मोहसीन नकवी हे प्रमुख आहेत. या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघामध्ये बऱ्याच अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. केन विलियमसन, टीम साऊदी, बोल्ट, सँटेनर, फिलीप्स, लॅथम, मिचेल, हेन्री, यंग, निकोलस हे या मालिकेत खेळणार नाहीत. न्यूझीलंडचे हे अव्वल खेळाडू सध्या भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत तसेच इंग्लीश कौंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. न्यूझीलंड संघाचे नेतृत्व मिचेल ब्रेसवेलकडे सोपविण्यात आले आहे.

पाक संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, इमाद वासीम, फक्र झमान, मोहम्मद आमीर, सईम अयुब, शादाब खान, इरफान खान नियाजी, इफ्तीकार अहमद, आझम खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, झमान खान, अब्बास आफ्रिदी, अब्रार अहमद, उसामा मीर.

न्यूझीलंड संघ -मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), अॅलेन, चॅपमन, क्लार्कसन, डफी, फॉक्सक्रॉप्ट, लिस्टर, मॅकोंची, मिल्ने, नीशम, ओरुरकी, रॉबिनसन, सियर्स, सिफर्ट आणि सोधी.

Advertisement
Tags :

.