गदारोळाच विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
केंद्राविरोधातील ठराव मागे घेण्याची मागणी : विरोधी आमदारांचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने विधानसभेत केंद्र सरकारविरोधात दोन ठराव संमत केल्याने भाजप आणि निजदच्या आमदारांनी शुक्रवारीही धरणे आंदोलन सुरूच ठेवले. केंद्राविरोधात मांडलेले ठराव मागे घ्यावे, अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी करून घोषणाबाजीही केली. या गदारोळामुळे मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणे शक्य झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी संपणारे विधिमंडळ कामकाज सोमवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले.
विधानसभेत गुरुवारी सायंकाळी केंद्र सरकारच्या अनुदान वाटपात झालेल्या अन्यायाविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत दर निश्चित करण्यासंबंधी मागणीचे ठराव मांडण्यात आले. हे दोन्ही ठराव भाजप आणि निजद आमदारांच्या धरणे आंदोलनातच संमत करण्यात आले. शुक्रवारी सकाळी विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच भाजप आणि निजदच्या आमदारांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे आंदोलन सुरू केले. मात्र, ठरावांवरून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ठराव मागे घेण्याची मागणी करत विरोधी आमदारांनी धरणे आंदोलन सुरूच ठेवले. तर धरणे मागे घ्यावे, अशी विनंती सत्ताधारी आमदारांनी केली. परंतु, भाजपने जुमानले नाही. त्यामुळे सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटे पुढे ढकलले. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजपच्या सदस्यांनी ठराव मागे घेण्यासंबंधी केलेल्या मागणीवर ठाम भूमिका घेतली. त्यामुळे समझोता होऊ शकला नाही.
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधी आमदारांनी धरणे आंदोलन सुरू ठेवून केंद्र सरकारविरोधात सरकारने मांडलेले दोन्ही ठराव मागे घ्यावेत, अशी मागणी केली. यावेळी निर्माण झालेल्या गदारोळातच दोन विधेयके मांडून संमत करण्यात आली. तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ प्रतीठराव मांडण्याची मुभा द्यावी, अशी विनंती सभाध्यक्षांकडे केली. मात्र, सभाध्यक्षांनी मुभा देण्यास नकार दर्शविला. त्यानंतरही विरोधी आमदारांनी राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुरू ठेवली. तर दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. यामुळे सभागृहात गोंधळ माजला. या गदारोळातच आर. अशोक यांनी स्वत: आणलेल्या ठरावांचे वाचन केले. परिणामी गोंधळात भर पडल्याने विधानसभेचे कामकाज सोमवारी 9:30 पर्यंत तहकूब करण्यात आले.