अमेरिकेची कोको गॉफ अजिंक्य
वृत्तसंस्था/ रियाद
2024 च्या टेनिस हंगामाच्या अखेरच्या येथे झालेल्या डब्ल्यूटीए फायनल्स महिलांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद अमेरिकेच्या कोको गॉफने पहिल्यांदाच पटकाविले.
अमेरिकेच्या 20 वर्षीय गॉफने अंतिम सामन्यात चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झेंग क्विनवेनचा 3-6, 6-4, 7-6 (7-2) अशा सेट्समध्ये पराभव केला. या लढतीत झेंगने पहिला सेट जिंकल्यानंतर गॉफने दुसरा सेट 6-4 असा जिंकून बरोबरी साधली. मात्र तिसरा आणि निर्णायक सेट अपेक्षेप्रमाणे टायब्रेकरपर्यंत लांबला. टायब्रेकरमध्ये गॉफने पहिले 6 गुण मिळविले. पण त्यानंतर झेंगने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला पण गॉफने आपल्या तिसऱ्या मॅच पॉईंटवर विजयी फोरहँड फटक्याचा वापर करत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. 2014 नंतर डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धा जिंकणारी कोको गॉफ ही अमेरिकेची पहिली टेनिसपटू आहे. 2014 साली सेरेना विलियम्सने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. गॉफला जेतेपदाबरोबरच 4.8 दक्षलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीसही मिळाले. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या इतिहासात 2004 सालातील रशियाच्या मारिया शरापोव्हानंतर जेतेपद मिळविणारी गॉफ ही सर्वात कमी वयाची महिला टेनिसपटू आहे. यावेळी या स्पर्धेमध्ये गॉफने अव्वल मानांकित साबालेंका आणि पोलंडची स्वायटेक यांना पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. गॉफ आणि झेंग यांच्यातील हा अंतिम सामना 3 तास चालला होता. गॉफने 26 ब्रेक पॉईंटची नोंद केली. गॉफने गेल्या मे महिन्यात झालेल्या रोम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झेंगचा पराभव केला होता. तसेच गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत गॉफने अंतिम सामन्यात साबालेंकाचा पराभव केला होता. 2024 च्या टेनिस हंगामात गॉफने सिनियाकोव्हासमवेत फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकाविले. रियादमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत कॅनडाची गॅब्रियेला डेब्रोव्हेस्कि आणि न्यूझीलंडची रुटलिफ यांनी महिला दुहेरीचे जेतेपद मिळविताना झेकची सिनियाकोव्हा आणि अमेरिकेची टेलर टाऊनसेंड यांचा 7-5, 6-3 असा पराभव केला.