अदानींना अमेरिकेची ‘क्लिन चिट’
हिंडेनबर्ग अहवालाला महत्त्व देण्याचे कारण नसल्याचे केले वक्तव्य
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या प्रशासनाने अदानी उद्योगसमूहाला ‘क्लिन चिट’ दिली आहे. तसेच या समूहाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये दोष असल्याचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग अहवालालाही महत्त्व देण्याचे कारण नाही, अशी स्पष्टोक्ती केली आहे. त्यामुळे काही काळापासून वादग्रस्त ठरविण्यात आलेल्या या उद्योगसमूहाला मोठाच दिलासा मिळाला असून 1.36 अब्ज डॉलर्सचे कर्ज अमेरिकेकडून मिळविण्याचा या समूहाचा मार्गही आता मोकळा झाला असून 55 कोटी डॉलर्स कर्ज संमतही झाले आहे.
अदानी समूह श्रीलंकेत कंटेनर बंदर बांधणी प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पासाठी या समूहाने अमेरिकेकडे 1.36 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली होती. तथापि, हिंडेनबर्ग या अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनीने काही महिन्यांपूर्वी अदानी उद्योसमूहातील कथित अनियमितता दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. तेव्हापासून हा उद्योगसमूह वादग्रस्ततेच्या भोवऱ्यात होता. तसेच समूहाच्या सममागांचीही मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र, आता अमेरिकेकडून क्लिन चिट मिळाल्याने या समूहाची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वधारली असून समूहाच्या अनेक कंपन्यांचे समभागही 5 टक्के ते 20 टक्के वधारले आहेत.
आर्थिक व्यवहारांची तपासणी
अमेरिकेच्या प्रशासनाने हे कर्ज संमत करताना अदानींच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्ररित्या तपासणी केली होती. तपासणीचे उत्तरदायित्व इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स इनकॉर्पोरेशन या संस्थेकडे सोपविण्यात आले होते. या संस्थेने अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केल्यानंतर आपला अहवाल अमेरिकेच्या प्रशासनाला दिला. व्यवहारांमध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. त्यामुळे हिंडेनबर्ग कंपनीच्या अहवालाला महत्त्व न देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला.
श्रीलंकेतील प्रकल्प अतिमहत्त्वाचा
श्रीलंकेत अमेरिकेच्या अर्थसाहाय्याने आणि भागीदारीत अदानी कंटेनर बंदर बांधणीचा प्रकल्प साकारत आहेत. दक्षिण आशिया खंडातील हा अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प मानला जात आहे. चीनने दक्षिण आशियात आपल्या प्रभावाचा विस्तार चालविला असून श्रीलंकेतील बंदरे आपल्या प्रभावाखाली घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना चाप लावण्यासाठी अमेरिकेने हा कंटेनर बंदर निर्मिती प्रकल्प अदानींच्या सहभागाने हाती घेतला आहे. अमेरिकेने अनेक वर्षांच्या चर्चेनंतर त्याला संमती दिली होती. आता हा प्रकल्प सुरळीत मार्गी लागणार आहे.
हे तर ‘विश्वासमत’
अदानी समूहाने अमेरिकेने दिलेल्या क्लिन चिटमुळे आनंद व्यक्त केला आहे. हे तर आमच्या बाजूने मिळालेले ‘विश्वास मत’ आहे, अशी प्रतिक्रिया गौतम अदानी यांनी व्यक्त केली. आमची क्षमता, आमची दूरदृष्टी आणि आमचे प्रशासन यांच्यावर झालेले हे आंतरराष्ट्रीय मुद्रांकन असून आमच्यावरील जगाचा विश्वास आता सार्थ ठरला आहे. भविष्यकाळात आम्ही अशाच क्षमतेने आमचे कार्य करीत राहू, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया या समूहाने व्यक्त केली आहे.
समभागांमध्ये तेजी
अमेरिकेने दिलेल्या क्लिनचिटचे वृत्त झळकताच, अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या समभागांमध्ये जगभरातील शेअरबाजारांमध्ये तेजी दिसून आली. अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीचे समभाग एक तासात 7.5 टक्के वधारले आहेत. तसेच अदानींच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या कंपन्यांवरही या क्लिनचिटचा सकारात्मक परिणाम शेअरबाजारांमध्ये दिसून येत आहे. लवकरच या कंपनीवरचे मळभ दूर होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.
अदानींचा विस्ताराचा मार्ग मोकळा
ड अदानी उद्योगसमूहाला क्लिन चिट देण्यात आल्याने समूहात समाधान
ड अमेरिकेच्या प्रशासनाकडून सखोल तपासणीनंतर क्लिन चिटचा निर्णय
ड अदानी समूहाच्या श्रीलंकेतील प्रकल्पासाठी मोठ्या कर्जालाही मान्यता
ड चीनच्या श्रीलंकेतील वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी आहे हा प्रकल्प