वेस्ट इंडिजसमोर आज अमेरिकेचे आव्हान
अमेरिका/ वृत्तसंस्था, ब्रिजटाउन (बार्बाडोस)
वेस्ट इंडिजला आज शनिवारी अमेरिका संघाचा सामना करावा लागणार असून तिसऱ्या विजेतेपदाच्या मोहिमेवर असलेल्या यजमानांना आणखी एक चूक परवडणार नाही. गटस्तरावर अपराजित राहिल्यानंतर वेस्ट इंडिजला त्यांच्या पहिल्या सुपर एट सामन्यात गतविजेत्या इंग्लंडकडून आठ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. तब्बल 51 चेंडू निर्धाव गेल्याची आणि स्ट्राइक फिरविण्यात अयशस्वी झाल्याची किंमत त्यांना चुकवावी लागली.
इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवाने केवळ रेवमन पॉवेल आणि त्याच्या संघाला गटात तळापर्यंत ढकलले नाही, तर त्यांची आता उणे 1.343 अशी निव्वळ धावसरासरी आहे आणि घरच्या मैदानावर विजेतेपद मिळविण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना मोठा विजय आज आवश्यक आहे.
दुसरीकडे, अमेरिकेने या महिन्याच्या सुऊवातीला नोंदविलेल्या पकिस्तानविऊद्धच्या विजयानंतर एकही सामना जिंकलेला नाही. पण त्यांनी भारताविरुद्ध चांगली टक्कर दिली आणि दक्षिण आफ्रिकेला जवळजवळ धक्का दिला होता. दक्षिण आफ्रिकेच्या उच्च दर्जाच्या माऱ्यासमोर त्यांना अवघ्या 18 धावा कमी पडल्या. स्पर्धेच्या या सहयजमानांनी दाखवून दिले आहे की, ते येथे फक्त संख्या वाढवण्यासाठी आलेले नाहीत आणि त्यांना हलक्याने घेतले जाऊ नये. ते आतापर्यंत आक्रमक क्रिकेट खेळले आहेत आणि आगामी सामन्यांमध्येही ते तसेच खेळत राहण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांची कमकुवत बाजू म्हणजे त्यांचा गोलंदाजीतील अननुभवी मारा असून निकोलस पूरन, आंद्रे रसेल, पॉवेलसारखे मोठे हिटर्स असलेल्या वेस्ट इंडिजला त्याचा फायदा करून घ्यायला आवडेल.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वा.