दीड वर्षीय मुलीचा जीव घेणारी अमेरिकन महिला अटकेत
प्रियकराच्या मुलीला खायला दिले होते नेल पॉलिश रिमूव्हर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या पोलिसांनी 18 महिन्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी एका युवतीला अटक केली आहे. 20 वर्षीय एलिसिया ओवेन्सने मागील वर्षी स्वत:च्या प्रियकराच्या दीड वर्षीय मुलीला बॅटरी, स्क्रू आणि नेल पॉलिश रिमूव्हर खायला दिले होते. यामुळे अत्यवस्थ झालेल्या मुलीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
जून 2023 मध्ये पेंसिलवेनिया येथे ही घटना घडली होती. मुलीच्या रक्तात एसीटोन (एकप्रकारचे रसायन) मिळाले होते आणि तेच मृत्यूसाठी कारणीभूत ठरले होते. हे रसायन नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये आढळते. दीड वर्षीय आइरिस रीटा अल्फेराच्या पोटात बटन शेपची बॅटरी, मेटल स्क्रू आणि वॉटर बीड्स आढळून आले होते.
एलियिसा ही आयरिसचे वडिल बेली जेकोबीसोबत राहत होती. तर आयरिस स्वत:ची आई एमिलीसोबत राहायची. बेली-एमिली यांचा घटस्फोट झाला होता. तर न्यायालयाने बेलीला आयरिसची भेट घेण्याची अनुमती दिली होती. 25 जून रोजी बेलीने स्वत:ची मुलगी आयरिसला घरी आणले होते. काही वेळानंतर तो मुलीला प्रेयसीसोबत घरी सोडून बाजारात गेला होता. काही वेळानंतर एलिसियाने त्याला फोन करत आयरिसची प्रकृती बिघडल्याचे कळविले होते. बेलीने घरी धाव घेत आयरिसला त्वरित रुग्णालयात नेले होते. तसेच त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी एलिसिया आणि बेली यांची चौकशी केली होती. तर उपचार सुरू असताना चौथ्या दिवशी आयरिसचा मृत्यू झाला होता. मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यावर मुलीच्या पोटात स्क्रू, बॅटरी आणि रक्तात एसीटोनचे अंश आढळून आले होते. अशा स्थितीत पोलिसांनी हत्येच्या दृष्टीकोनातून तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी एलिसियाचा फोन ताब्यात घेतला होता. तिच्या फोनची सर्च हिस्ट्री पाहिल्यावर गुन्ह्याचा उलगडा झाला होता. मुलांना नुकसान पोहोचेल किंवा त्यांचा मृत्यू होईल अशा घरगुती उत्पादनांचा ती शोध घेत होती. येथूनच तिला छोटी बॅटरी, नेल पॉलिशमुळे मुलांचा मृत्यू होऊ शकतो हे कळले होते.