भारत, इस्रायलद्वेष्टा होता अमेरिकन स्कूल शूटर
ज्यूधर्मीयांचा करायचा प्रचंड द्वेष : शस्त्रास्त्रावर भारतविरोधी मजकूर : मिनियापोलिस येथील चर्चमध्ये गोळीबार : 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू
वृत्तसंस्था/मिनियापोलिस
अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरातील गोळीबाराच्या घटनेने पूर्ण देश हादरून गेला आहे. गोळीबाराची ही घटना बुधवारी (स्थानिक प्रमाणवेळेनुसार) घडली आहे. मिनियापोलिसच्या एका चर्चमध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा सुरू असताना गोळीबार झाला. हल्लेखोराने चर्चमध्ये प्रवेश करत मुलांवर गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर 23 वर्षीय रॉबिन वेस्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. रॉबिनने गोळीबाराच्या घटनेनंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. मृतदेहाजवळून मिळालेल्या बंदुकीवर भारत आणि इस्रायलच्या विरोधातील द्वेषपूर्ण मजकूर दिसून आला आहे.
एफबीआयने या घटनेला देशांतर्गत दहशतवाद आणि द्वेष गुन्हा संबोधिले आहे. कॅथोलिकांना लक्ष्य करत हा प्रकार घडल्याचे एफबीआयने म्हटले आहे. हल्लेखोराने प्री-किंडरगार्टनपासून 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रार्थनासभेत रक्तपात घडवून आणला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्लेखोराकडे रायफल, शॉटगन आणि पिस्टल होते. त्याने खिडक्यांमधून मुलांवर गोळीबार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 8 आणि 10 वर्षांचे वय असलेल्या दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गोळीबारात अन्य 14 मुले आणि तीन वृद्ध जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोराने पार्किंगमध्ये बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती, असे पोलीस प्रमुख ब्रायन ओहारा यांनी सांगितले.
कोण होता रॉबिन वेस्टमॅन?
गोळीबार 23 वर्षीय रॉबिन वेस्टमॅनने केला होता, तो पुरुष म्हणून जन्मला होता आणि त्याचे प्रारंभिक नाव रॉबर्ट होते. 2023 साली त्याने कायदेशीर स्वरुपात नाव बदलत स्वत:ची ओळख महिलेच्या स्वरुपात नोंदविली होती, अशी माहिती एफबीआय प्रमुख काश पटेल यांनी दिली. वेस्टमॅनने गोळीबारासाठी वापरलेली रायफल, पिस्टल आणि बंदूक कायदेशीर मार्गाने खरेदी केली होती. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. वेस्टमॅनच्या गोळीबाराचा उद्देश अद्याप समोर आलेला नाही.
ज्यूंबद्दल होता पराकोटीचा द्वेष
मी माझ्या परिवारावर प्रेम करतो आणि आता याहून अधिक मी सहन करू शकत नाही. जर मी वंशद्वेषी हल्ला केला तर गलिच्छ जायोनिस्ट ज्यूंच्या विरोधात तो असण्याची सर्वाधिक शक्यता आहे, असे तो म्हणत असल्याचे एका व्हिडिओत दिसून येते. तर एका ठिकाणी त्याने पॅलेस्टाइनला स्वतंत्र करा असे लिहिले आहे.
भारतावर अणुबॉम्ब टाका
मला फॅसिस्टवादाचा द्वेष आहे आणि मला मुलांना गोळी लागताना पाहणे आवडते. मुलांचे तुकडे-तुकडे होणे पाहणे चांगले वाटते असे त्याने एका कागदावर लिहिले आहे. तर त्याच्याकडे मिळालेल्या शस्त्रास्त्रावर ‘भारतावर अणुबॉम्ब टाका’, ‘इस्रायलचे पतन व्हायला हवे’ असे लिहिले होते.