For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा सोमवारपासून

06:35 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा सोमवारपासून
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला येथे सोमवार दि. 26 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे.या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. पुरूष विभागात इटलीचा जेनिक सिनेर तर महिलांच्या विभागात पोलंडची इगा स्वायटेक यांना टॉप सिडींग देण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये विद्यमान विजेता सर्बियाचा नोव्हॅक जोकोव्हिच तसेच महिलांच्या विभागातील विद्यमान विजेती अमेरिकेची कोको गॉफ यांना ठळक प्रसिद्धी देण्यात आली आहे. सदर स्पर्धा 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. जोकोव्हिच आणि गॉफ यांचे येथे आगमन झाले. त्यावेळी टेनिस शौकिनांनी बरीच गर्दी केली. महिलांच्या विभागातील विद्यमान विजेती कोको गॉफ चालु वर्षीच्या क्रिकेट हंगामातील उत्तरार्धात सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. गेल्या सात सामन्यांमध्ये तिने चार सामने जिंकले असून तीन सामने गमविले आहेत. गेल्या वर्षी 20 वर्षीय गॉफने वॉशिंग्टन आणि सिनसीनॅटी स्पर्धा जिंकून आपल्या दर्जेदार कामगिरीची पावती दिली. यावेळी गॉफचा सलामीचा सामना फ्रान्सच्या ग्रेचेव्हाशी होणार आहे. तिसऱ्या फेरीत गॉफची गाठ स्विटोलिनाशी पडेल, असा अंदाज आहे.

Advertisement

सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू जोकोव्हिचने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 24 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून आता तो या स्पर्धेत ऐतिहासिक 25 वे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जोकोव्हिचने स्पेनच्या अल्कारेझला पराभूत करुन सुवर्णपदक मिळविल्याने त्याचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. गेल्या जुलै महिन्यात विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत अल्कारेझकडून जोकोव्हिचला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, त्याची परतफेड जोकोव्हिचने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केली. मात्र पुन्हा यावेळी या स्पर्धेत अल्कारेझ आणि जोकोव्हिच यांच्यातच जेतेपदासाठी लढत अपेक्षित आहे. दरम्यान इटलीच्या सिनेरकडून चमत्कार घडू शकेल. सिनेरचा पहिल्या फेरीतील सामना अमेरिकेच्या मॅकडोनाल्डशी होणार आहे. सिनेर आणि जोकोव्हिच हे पुरूष एकेरीच्या ड्रॉमध्ये विरुद्ध दिशेला आहेत. अल्कारेझ, सिनेर हे ड्रॉच्या पहिल्या अर्धटप्प्यात तर जर्मनीचा व्हेरेव्ह आणि जोकोव्हिच हे ड्रॉच्या दुसऱ्या अर्धटप्प्यात आहे. महिलांच्या विभागात स्वायटेक व रायबाकिना हे ड्रॉच्या वरच्या अर्धटप्प्यात तर गॉफ आणि साबालेंका या ड्रॉच्या दुसऱ्या अर्धटप्प्यात आहेत. ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या क्वीनवेनला या स्पर्धेत सातवे मानांकन देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.