अमेरिकन गॅम्बिट्सची गंगा ग्रँडमास्टर्सवर 10-4 मात
नाकामुराचा आनंदला धक्का
वृत्तसंस्था/ लंडन
टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग स्पर्धेच्या चौथ्या दिवशी पहिल्या लढतीत विश्वनाथन आनंदच्या नेतृत्वाखालील गंगा ग्रँडमास्टर्सविऊद्ध 10-4 असा महत्त्वपूर्ण विजय मिळवताना ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा आणि एलिझाबेथ पेहत्झ यांनी अमेरिकन गॅम्बिट्सच्य मोहिमेचे नेतृत्व केले. पाच सामन्यांमध्ये चार पराभवांसह आनंदचा संघ आता गंभीर संकटात सापडला आहे.
अमेरिकन गॅम्बिट्स दिवसाची सुरुवात केली तेव्हा तीन सामन्यांतून केवळ एका विजयासह क्रमवारीत तळाशी होते. त्यांच्या अगदी पुढे पाचव्या स्थानावर गंगा ग्रँडमास्टर्स होते. नाणेफेकीनंतर गॅम्बिट्स पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणार हे निश्चित झाले. ‘आयकॉन’ बोर्डवर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाकामुराने पाच वेळचा माजी विश्वविजेता आणि गंगा गँडमास्टर्सचा नेता आनंदला आश्चर्यचकीत केले. या लढतीत नाकामुराने दबाव कायम ठेवत आनंदला अधिक वेळ घालवण्यास भाग पाडले. शेवटच्या सेकंदांत आनंद स्पष्टपणे दबावाखाली आल्याचे दिसून आले व नाकामुराने त्याचा फायदा घेत विजय नोंदविला.
महिला खेळाडूंमधील लढतीत गंगा ग्रँडमास्टर्सच्या नुरग्युल सलीमोव्हाने एलिझाबेथवर जोरदार हल्ला केला होता. तथापि, जर्मन खेळाडू एलिझाबेथने शानदार बचाव केला आणि शेवटी विजय मिळवत गॅम्बिटचे पारडे जड केले. दुसऱ्या ‘आयकॉन’ बोर्डवर परहम मगसुदलूने वेगवान चाली करत वेई यीविऊद्धचा सामना बरोबरीत सोडविला. इतर पटांवर बिबिसारा असाउबायेव्हा आणि आर. वैशाली यांच्यातील सामना तसेच जॅन-क्रिझिस्टोफ डुडा व अर्जुन एरिगेसी यांच्यातील सामना बरोबरीत संपला. त्याचप्रमाणे जोनास बजेर्रे आणि वोलोदार मुर्झिन या कनिष्ठ खेळाडूंमधील लढतही बरोबरीत सुटली. नाकामुराच्या संघाचे आता चार सामन्यांतून दोन विजय झाले आहेत. दुसरीकडे, गंगा ग्रँडमास्टर्सने स्वत:ची घसरण थांबवण्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे.
दरम्यान, स्पर्धेत आघाडीवर असलेल्या अलास्कन नाइट्सला तिसऱ्या स्थानावर असलेल्या अल्पाइन एसजी पायपर्सच्या कठीण आव्हानाचा सामना करावा लागला आणि रोमहर्षक लढतीत त्यांनी 9-7 अशी मात केली. ‘आयकॉन’ पटावर त्यांचा मुख्य खेळाडू अनीश गिरीने केलेली एक चूक त्याला महागात पडून फक्त 22 चालींमध्ये त्याचा पराभव झाला. लीगची आतापर्यंतची ही सर्वांत लहान लढत ठरून ती फक्त 20 मिनिटे चालली. सुपरस्टार्सच्या पटावर मामेद्यारोव्हने रॅपपोर्टशी बरोबरी साधली, तर अब्दुसत्तारोव्हने आर. प्रज्ञानंदवर विजय मिळवला. याशिवाय टॅन झोंगयीने हौ यिफानचा पराभव केला आणि काश्लिंस्काया व लागनो यांच्यातील लढत बरोबरीत संपली. ‘पीबीजी’च्या निहाल सरीनने डॅनियल दार्धाविरुद्धचा सामना तीन सेकंद बाकी असताना बरोबरीत संपविला.
सीझन वनमधील विजेते त्रिवेणीचा ’आयकॉन’ खेळाडू, अलिरेझा फिरोजाने मुंबा मास्टर्सच्या मॅक्झिम वॅचियर-लाग्रेव्हचा आरामात पराभव केला. त्याच्या संघाने ही लढत 12-3 ने जिंकली. त्यात वेई यीने विदित गुजराथीवर विजय मिळवला, तर महिलांमध्ये गुनिनाने डी. हरिकावर मात केली.