अमेरिकन क्रिकेट संघाचा विश्वविक्रम
वृत्तसंस्था/ अल अमारात (मस्कत)
आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या लीग 2 मधील येथे झालेल्या सामन्यात अमेरिकन क्रिकेट संघाने नवा विश्वविक्रम करताना ओमानचा 57 धावांनी पराभव केला. पुरुषांच्या वनडे क्रिकेट प्रकारात अमेरिकन क्रिकेट संघाने कमी धावसंख्येचे संरक्षण करीत विजय मिळविण्याचा विक्रम केला आहे.
या सामन्यात अमेरिकन संघातील फिरकी गोलंदाज नोसथुश केनजिगे याने 11 धावांत 5 गडी बाद केल्याने ओमानचा डाव केवळ 65 धावांत आटोपला. अमेरिकन संघातील मिलिंद कुमारने 17 धावांत 2 गडी बाद केले. त्याने ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगला 7 धावांवर बाद केले. हरमीत सिंगने 25 धावांत 1 तर यासीर मोहम्मदने 10 धावांत 2 गडी बाद केले. पुरुषांच्या वनडे क्रिकेट प्रकारात ओमानची ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. तत्पूर्वी, अमेरिकेचा डाव 35.3 षटकात 122 धावांवर समाप्त झाला होता. अमेरिकन संघातील मिलिंद कुमारने नाबाद 47, अॅरॉन जोन्सने 16, संजय कृष्णमूर्तीने 16 धावा केल्या. ओमानतर्फे शकिल अहमदने 20 धावांत 3 गडी बाद केले.