अमेरिकेची कोको गॉफ नवी फ्रेंच सम्राज्ञी
वृत्तसंस्था / पॅरिस
2025 च्या फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत शनिवारी अमेरिकेच्या 21 वर्षीय कोको गॉफने साबालेंकाचा पराभव करत पहिल्यांदाच महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. प्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत गॉफ नवी प्रेंच सम्राज्ञी ठरली. रविवारी इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनेर आणि स्पेनचा कार्लोस अल्कारेझ यांच्यात पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
महिला एकेरीचा हा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणे चुरशीचा ठरला. 21 वर्षीय गॉफचे रोलॅन्ड गॅरो क्लेकोर्टवरील हे पहिले जेतेपद आहे. गॉफने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत आतापर्यंत दोन ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. 2023 च्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत गॉफने पहिले जेतेपद मिळविले होते. शनिवारच्या अंतिम सामन्यात गॉफने साबालेंकाचा 7-6 (7-5), 2-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत चषकावर आपले नाव पहिल्यांदाच कोरले. मात्र साबालेंकाला फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्या अजिंक्यपदाने पुन्हा हुलकावणी दिली.
या लढतीतील पहिल्या सेटमध्ये साबालेंकाने आपल्या सर्व्हिसवर चांगलेच नियंत्रण ठेवले होते. या सेट्मध्ये गॉफने आपल्या वेगवान फटक्याच्या जोरावर साबालेंकाला चुका करण्यास भाग पाडले आणि गॉफने हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबविला. टायब्रेकरमध्ये साबालेंकाने आपल्या उत्कृष्ट ड्रॉप शॉट्सच्या जोरावर हा सेट 7-6 (7-5) असा जिंकून आघाडी मिळविली. या पहिल्या सेट्समध्ये साबालेंकाने सुरुवातीलाच गॉफवर 4-1 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर गॉफने साबालेंकाने केलेल्या चुकीचा फायदा घेत 4-4अशी बरोबरी साधली. साबालेंकाकडून यावेळी दुहेरी चूक नोंदविली गेली. साबालेंकाची स्थिती यावेळी 5-4 अशी होती आणि तिला हा सेट जिंकण्यासाठी केवळ एका गुणाची जरुरी होती. पण गॉफने पुन्हा 6-6 बरोबरी केल्याने हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला गेला. टायब्रेकरमध्ये साबालेंकाने आपल्या अनुभवाच्या जोरावर गॉफला नमवित सेट जिंकला.
एका सेटने आघाडी मिळविलेल्या साबालेंकाला दुसऱ्या सेटमध्ये आपली सर्व्हिस अधिकवेळ राखता आली नाही. या सेटमध्ये गॉफने आपली सर्व्हिस अधिकवेळ राखली तसेच आपल्या फटक्यामध्ये विविधता आणल्याने साबालेंकाची टेनिसकोर्टवर परतीचे फटके मारण्यासाठी चांगलीच धावपळ झाली. गॉफने साबालेंकाला वारंवार नेटजवळ खेचले. पण साबालेंकाकडून या सेटमध्ये अनेकवेळा दुहेरी चुका झाल्याने तिला या सेटमधील केवळ दोन गेम्सवर समाधान मानावे लागले. गॉफने हा दुसरा सेट 6-2 असा जिंकून साबालेंकाशी बरोबरी साधली.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंवर चांगलेच दडपण आले होते. दरम्यान साबालेंकाकडून महत्त्वाच्या क्षणी दोन चुकीचे बॅकहॅन्ड फटके आणि दुहेरी चुकीमुळे कोको गॉफला साबालेंकाची सर्व्हिस भेदण्यात यश मिळाले. गॉफने यावेळी साबालेंकावर 4-3 अशी आघाडी घेतली होती. गॉफने आणखी एक गेम जिंकून आपली आघाडी 5-3 अशी वाढविली. साबालेंकाचा बॅकहॅन्डचा फटका बाहेर गेल्याने गॉफ आता जेतेपदाच्या समिप पोहोचली होती. तिला जेतेपदासाठी केवळ दोन गुणांची आवश्यकता होती. साबालेंकाने आणखी गुण मिळवून सामन्याला रंगत आणली. पण गॉफने शेवटी आपल्या फोरहॅन्ड फटक्याच्या जोरावर हा शेवटचा आणि तिसरा सेट 6-4 असा जिंकून साबालेंकाचे आव्हान संपुष्टात आणत प्रेंच चषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. साबालेंकाने या सामन्यात 26 विजयी फटके मारले तर तिच्याकडून अनेक दुहेरी चुकांची नोंद झाली.
सिनेर अंतिम फेरीत
पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात सिनेरने सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात इटलीच्या लोरेंझो मुसेटीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने स्पेनच्या 22 वर्षीय अल्कारेझने एकेरीची अंतिम फेरी गाठली.
पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत सिनेरने जोकोविचचा 6-4, 7-5, 7-6 (7-3) अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात जोकोविचच्या तुलनेत सिनेरची सर्व्हिस आणि फोरहॅन्डचे फटके अचूक आणि वेगवान होते. हा सामना एकतर्फी न होता शेवटच्या क्षणी पुन्हा चुरस पहावयास मिळाली. जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत विक्रमी 24 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. जोकोविचची कोर्टवर दमछाक झाल्याचे जाणवत होते. जोकोविचने यापूर्वी तीनवेळा फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने इटलीच्या मुसेटीचा 4-6, 7-6 (7-3), 6-0, 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या लढतीत मुसेटीने पहिला सेट 6-4 असा जिंकून अल्कारेझवर चांगलेच दडपण आणले होते. मात्र दुसऱ्या सेटमध्ये अल्कारेझने आपली सर्व्हिस अधिकवेळ राखली. दरम्यान हा दुसरा सेट त्याने टायब्रेकरमध्ये 7-6 (7-3) असा जिंकून बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये मुसेटीचा खेळ पूर्ण निष्प्रभ ठरला. या सेटमध्ये त्याला एकही गेम जिंकता आला नाही. अल्कारेझने हा सेट 6-0 असा एकतर्फी जिंकून मुसेटीवर आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये अल्कारेझने पहिले दोन गेम्स जिंकल्यानंतर मुसेटीच्या डाव्या पायामध्ये वेदना होऊ लागल्या. स्नायु दुखापत असल्याचे दिसून आल्याने त्याने काहीवेळ कोर्टवर विश्रांती घेतली. पण वेदना न थांबल्याने त्याने हा सामना अर्धवट सोडला. टेनिस स्पर्धेच्या इतिहासामध्ये पाच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा अल्कारेझ हा पाचव्या क्रमांकाचा तरुण टेनिसपटू आहे. यापूर्वी सर्बियाच्या जोकोविचने 37 वेळा, तर रशियाच्या मेदव्हेदेवने 6 वेळा असा पराक्रम केला आहे.