अमेरिकेला ‘टॅलेंट’ची आवश्यकता
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एच-वन बी व्हिसाचे समर्थन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एच-वन बी’ व्हिसा पद्धतीचे समर्थन केले आहे. अमेरिकेला जगभरातून टॅलेंट आणण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एच-वन बी व्हिसा पद्धती चालू ठेवली जाणार आहे. ती रद्द करता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
आपले प्रशासन या व्हिसा पद्धती मोठ्या प्रमाणात प्राधान्य देणार नाही. अमेरिकेतील लोकांनाच अमेरिकेत जास्तीत जास्त रोजगार मिळाले पाहिजेत, हे माझ्या प्रशासनाचे धोरण आहे. तथापि, काही क्षेत्रांमध्ये अमेरिकेत टॅलेंटची कमतरता आहे. ती भरुन काढण्यासाठी जगातून प्रतिभावंत लोकांना अमेरिकेत आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एच-वन बी व्हिसा पद्धती उपयोगाची ठरत असल्याने ती आम्ही राखणार आहोत. त्यामुळे ती बंद केली जाणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ते अमेरिकेतील एका वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते.
टॅलेंटची कमतरता
मुलाखतकर्ती पत्रकार लौरा इनग्रॅहॅम यांनी ट्रम्प यांना त्यांच्या स्थलांतरितांसंबंधीच्या धोरणावर अनेक प्रश्न विचारले. अमेरिकेत भरपूर प्रमाणात टॅलेंट आहे, अशी टिप्पणी त्यांनी करताच ट्रम्प यांनी ती नाकारली. अमेरिकेत सर्व क्षेत्रातील टॅलेंट आज उपलब्ध नाही. काही क्षेत्रांमध्ये आम्हाला टॅलेंट जगातील अन्य देशांमधून आणावे लागणार आहे. काही क्षेत्रांमध्ये अमेरिकेतील लोकांना अजून प्रशिक्षित करावे लागणार आहे. अमेरिकेतले लोक विशिष्ट क्षेत्रांमध्ये सक्षम झाल्याखेरीज त्यांना त्वरित त्या क्षेत्रांमध्ये रोजगार दिला जाऊ शकत नाही. आम्हाला जगातील टॅलेंटची आवश्यकता आहे, अशी स्पष्टोक्ती ट्रम्प यांनी केली.
पद्धती बंद करण्याची मागणी
अमेरिकेत ट्रम्प यांच्या अनेक समर्थकांनी एच-वन बी व्हिसा पद्धती बंद करण्याची मागणी केली आहे. या व्हिसा पद्धतीमुळे अमेरिकेतील नागरिकांना नोकऱ्या मिळत नाहीत. साध्या-साध्या कामांसाठीही अन्य देशातून कर्मचारी घेतले जात असल्यामुळे अमेरिकेतील लोकांमध्ये बेकारी पसरली आहे. म्हणून ही पद्धती बंद करावी, अशी मागणी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तथापि, ही पद्धती बंद केल्यास अमेरिकेत प्रतिभावंत कर्मचारी आणि तंत्रज्ञांची कमतरता निर्माण होईल आणि विज्ञान-तंत्रज्ञान तसेच उच्च तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात अमेरिका मागे पडण्याची शक्यता आहे, असे या पद्धतीचे समर्थक म्हणतात.