डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी पालिका कायद्यात बदल
नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : पालिका व्यवहार 15 दिवसांत ऑनलाईन होणार
पणजी : राज्यात डेंग्यूचे ऊग्ण वाढत आहेत. ही चिंतेची बाब असून, डेंग्यूला जर हद्दपार करायचे असेल तर केवळ पालिकेनेच नव्हे, तर इमारत मालक व गृह सोसायट्यांनीही जबाबदारी घेऊन फवारणी करायला हवी. आता यापुढेही ही जबाबदारी इमारत मालक व सोसायट्यांवर राहणार आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. डेंग्यूशी लढण्यासाठी पालिका कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. या संदर्भात विधानसभेत लवकरच नवीन विधेयक मांडले जाईल. त्यानंतर आरोग्य विभाग आणि पालिकेवरील ताण कमी होईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. मंत्री राणे यांनी काल बुधवारी सर्व पालिकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोकांच्या समस्यांना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले. सर्व मुख्य अधिकाऱ्यांना 15 दिवसांच्या आत सर्व पालिका सेवा (कर, भाडे भरणा इ.) ऑनलाइन करण्याचे निर्देश दिले आहेत. 15 दिवसांनंतर पालिकेत कोणतेही अर्ज प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत.
उत्तर गोव्यात जीआयएस मॅपिंग
उत्तर गोव्याचे जीआयएस मॅपिंग सुरू आहे. जी नवीन घरे आहेत, त्यांचे मूल्यांकन अद्याप झालेले नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या घरांचे मॅपिंग केल्यानंतर पालिकेच्या महसुलात वाढ होईल. याशिवाय पालिकेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची गरज आहे. वाळपई आणि फोंडा नगरपालिकांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. म्हापसा आणि मुरगाव नगरपालिकांसाठीही मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
सात वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना खूषखबर
सात वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कायमस्वऊपी सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच शासनाकडून पालिकेकडे येणारा निधी अद्याप वापरण्यात आलेला नाही. त्याचा वापर योग्यरित्या व्हावा यासाठी पालिका मंडळांची मदत घेतली जाणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.