Ambabai Temple Kolhapur: करवीर निवासिनीची वरलक्ष्मी व्रतपूजा, काय आहे महत्व?
या सर्वांपेक्षा वेगळे असे महत्त्वपूर्ण व्रत म्हणजेच ‘वरदलक्ष्मी व्रत’ आहे
By : सौरभ मुजुमदार
कोल्हापूर : कोल्हापूरची श्री महालक्ष्मी महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पिठांपैकी एक पूर्ण पीठ असल्याने या नगरीला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. काही तिथींना येणारी देवीची व्रते महत्त्वपूर्ण मानली जातात. परंतु या सर्वांपेक्षा वेगळे असे महत्त्वपूर्ण व्रत म्हणजेच ‘वरदलक्ष्मी व्रत’ आहे.
व्रताचे आहेत पौराणिक उल्लेख
प्राचीन काळी शौनक ऋषींनी नैमिष अरण्यात सुताला विचारलेल्या प्रश्नात ही चर्चा झाल्याचे उल्लेख आढळतात. पुराण सांगणाऱ्यांनी (सूत) त्यावेळी पार्वतीने शंकराला विचारल्यावर हे व्रत सांगितल्याचे पौराणिक उल्लेख आहेत. श्रावण महिन्यातील शुक्रवारी अथवा श्रावणी पौर्णिमेला हे व्रत केले जाते. या व्रतात लक्ष्मी देवतेची चतुर्भुज मूर्ती घेऊन वेगवेगळ्या 21 जातीच्या पल्लवांनी (पत्री अथवा झाडांची पाने) पूजा करतात.
पंचांगकर्ते लाटकराकडे पौरोहित्य
अंबाबाई मंदिरात श्रावणातील पौर्णिमेनंतर येणाच्या शुक्रवारी या व्रताची पूजा साकारली जाते. श्रीपूजकांपैकी प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात येणाऱ्या पौर्णिमेनंतरच्या शुक्रवारी मंदिरात ही प्राचीन परंपरा आजही भक्तीपूर्ण वातावरणात सुरू आहे. देवीच्या इतर विधींसोबतच या पूजेचे पौरोहित्यही पंचांगकर्ते लाटकर या घराण्याकडे आहे.
सूर्यास्तावेळी होते पूजा
या दिवशी आई अंबाबाईचे सकाळचे नित्याचे धार्मिक विधी आटोपल्यानंतर केवळ याच दिवशी देवीची दुपारची सुवर्ण अलंकार पूजा बांधली जात नाही. वरदमहालक्ष्मी व्रताची पूजा सूर्यास्तावेळी सुरु होते. देवीच्या मुख्य गर्भगृहात ही पूजा तीन तास चालते. यामध्ये देवीचे स्वतंत्र पीठ मांडावे लागत नाही. कारण करवीर निवासिनी महालक्ष्मी हे साडेतीन पीठापैकीच असल्याने स्वतंत्र पिठाची आवश्यकता नसते.
यामध्ये देवीच्या 1008 नामांचे स्मरण केले जाते व देवीला तुलसी पत्र, बिल्व पत्र, पल्लवपत्री यांसह केवडा आदी पत्रींचा वापर केला जातो. तसेच दशतंतूंचा दोरा, काळा, लाल, पिवळा अशा विविध रंगांचे रेशमीतंतुयुक्त दोरे हातात बांधले जातात. केवळ याच दिवशी देवीची सुवर्ण अलंकार पूजा नसल्याने अनेक भक्तांना याबाबत उत्सुकता असते.
दिव्यस्वरुपाने मन होते प्रसन्न
या पूजेनंतर देवीचे दिव्यस्वरूप व दैदीप्यमान रूप पाहून मन खरोखर प्रसन्न होते. यावेळी देवीला वस्त्र परिधानानंतर वस्त्र कार्पासमणी (कापसाचे वस्त्र) व गेजवस्त्र तसेच केवडा यांनी सुंदर सजविले जाते. पूजाविधी पूर्ण झाल्यावर नेहमीप्रमाणे धुपारती, पंचारती ,महानैवेद्य व कापूर आरती होऊन शंखतीर्थ शिंपडले जाते. रात्री साडेनऊ वाजता देवीचा दर शुक्रवारी होणारा नित्य पालखी सोहळा हादेखील तेवढ्याच उत्साहाने त्या दिवशी पार पडतो.
यंदाची पूजा आज 8 रोजी
वरद महालक्ष्मी हे दाम्पत्याने करावयाचे काम्यव्रत आहे. लक्ष्मीचा वरदहस्त रहावा यासाठी हे केले जाते. श्री सूक्ताची 21 आवर्तने केली जातात. त्याचबरोबर अंबाबाईला जलाभिषेक व तुळशी पाने, फुले, केवडा, व कमळ अलंकार म्हणून वापरली जातात. या पुजेसाठी सुवर्ण वा नेहमीचे धातुचे अलंकार वापरले जात नाहीत. नैसर्गिक पानाफुलांच्या अलंकारातून देवीची वैशिष्ट्यापूर्ण पूजा साकारली जाते. यावर्षी ही पूजा शुक्रवार8 ऑगस्ट रोजी सायंकाळी होणार आहे.