Ambabai Temple: मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पू्र्ण, उद्यापासून अंबाबाईचे दर्शन घेता येणार
यामुळे अंबाबाईच्या मूर्तीचे सौंदर्य खुलण्यास मदत झाली आहे
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. भारतीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. विनोद कुमार व तिघा तज्ञांनी ही प्रक्रिया केली. अंबाबाईच्या मूर्तीवर दिसून येणारे जुनाट पांढरे डाग पूर्णपणे हटवले. यामुळे अंबाबाईच्या मूर्तीचे सौंदर्य खुलण्यास मदत झाली आहे, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
डॉ. विनोद कुमार व तज्ञ सहकारी नीलेश महाजन, सुधीर वाघ, मनोज सोनवणे यांनी सोमवारी रात्री अंबाबाईच्या मूर्तीची काही काळ पाहणी केली होती. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थितीत तज्ञांनी मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेला सुरुवात केली.
2015 साली अंबाबाईच्या मूर्तीवर पांढरे डाग दिसून येत होते. हे डाग हटवण्यासाठी बऱ्याचदा संवर्धनाची प्रक्रिया केली होती. परंतु त्यात यश येत नव्हते. मात्र यावेळी केलेल्या संवर्धन प्रक्रियेत मूर्तीवरील पांढरे डाग हटवण्यात डॉ. विनोद कुमार कुमार व सहकाऱ्यांना यश आले. यामुळे मूर्तचि सौंदर्य अधिक खुलले असल्याचे डॉ. विनोद कुमार यांनी देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, दोन दिवस अंबाबाईच्या गाभाऱ्याचा दरवाजा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सोमवारप्रमाणे मंगळवारीही उंबरठ्याच्या विराजमान मंदिरातील पितळी आतील भागात केलेल्या अंबाबाईची उत्सवमूर्ती व कलशाचे भाविकांना दर्शन घ्यावे लागले.
उद्यापासून घेता येणार अंबाबाईचे दर्शन
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे डॉ. विनोद कुमार यांनी केलेल्या सूचनेनुसार बुधवार, १३ रोजी अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे. तसेच गाभाऱ्यातील अन्य काही कामेही केली जाणार आहेत. याही कामासाठी गाभाऱ्याचा दरवाजा बंदच ठेवला जाणार आहे.
त्यामुळे अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन आजही होणार नाही. गुरुवार, १४ पासून मात्र धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तचि दर्शन देण्यास सुरुवात केली जाईल, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मंगळवारी रात्री उशिराने दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे.