Cultural Kolhapur: नागपंचमी अंबाबाईची, महांकाली मंदिरातील नागकुंड
लोकाचारात हा दिवस प्रचलित आहे तो भावाचा उपवास म्हणून
By : प्रसन्न मालेकर
कोल्हापूर : श्रावण महिन्यात सण वारांची अक्षरश: रेलचेल असते. श्रावण उजाडला की समोर उभी ठाकते ती नाग पंचमी! नागपंचमी हा सण जरी एक दिवसाचा समजत असलो तरी तो सुरू होतो तो चतुर्थीला. या चतुर्थीला पण नागचतुर्थी असंच नाव आहे. पण लोकाचारात हा दिवस प्रचलित आहे तो भावाचा उपवास म्हणून.
बहिणचा उपवास भावासाठी
एरव्ही भावाच्या नावाने अखंड बोटं मोडणारी बहीणपण हा उपवास अगदी आवडीनं करते. कारण याला नियम एकच भाजकं अन्न खायचं भाजणीची थालीपीठ, धपाटे, डाळतांदळाची खिचडी, लाडूलाह्या. असलं भाजकं खाऊन वर ‘बघ मी तुझ्यासाठी उपवास केलाय’, असं सांगायची संधी एकही बहिण सोडत नसेल. आज जरी आपल्याला या उपवासाचं महत्त्व वाटत नसलं तरी पूर्वी दूरदेशी दिलेल्या बहिणींना भावाचा किती आधार वाटत असेल याची आज आपण केवळ कल्पनाच केलेली बरी.
हलक्या आहाराचं महत्त्व
थोडक्यात श्रावणाच्या वातावरणात पोषक, पचायला हलका असा भाजका आहार या व्रताच्या निमित्ताने घेतला जातो. दुसरा दिवस उजाडतो तो पंचमीचा. साजशृंगार करुन वारूळाला नाग पुजेला जायचा! आज काही कापायचं नाही, चिरायचं नाही भाजायचं नाही. त्यामुळे केवळ पुरणाची दिंड उकडली की झालं. नागपंचमी, वटसावित्री, मंगळागौर ही व्रतंच अशी की गोतावळा जमून केल्याशिवाय गंमत नाही. जुन्या कोल्हापूरची वस्ती दाटीवाटीची. त्यामुळे वारूळ शोधायला गावाबाहेर जायला लागायची शक्यता मोठी. मग काय जिथे अडेल तिथं अंबाबाई!
पाचफणी नागाची स्थापना
आधी महालक्ष्मी आणि नाग यांचे नातं जणू मायलेकरांचं. साक्षात ब्रह्मदेवांना नाग रुपात तिच्या मस्तकावर विराजमान आहेत. तसंच पराशरांच्या आज्ञेनं पन्नगालय अर्थात पन्हाळ्यावरील नागगणांनी करवीरची परिक्रमा केली या नागांचे विषपतन जिथं जिथं झालं तिथं तिथं त्यांनी आपल्या नावाने तीर्थ निर्माण केली. अशा नागांच्या उत्सवात जगदंबा कशी मागे राहील? या दिवशी नागचतुर्थीला महासरस्वती समोर डाव्या बाजूला मोठा पाच फणीचा पितळी नाग स्थापन केला जातो.
ज्येष्ठ श्रीपूजकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा मातीचा नाग पुजला जातो. पण सध्या काहीवेळा रेखीव असा भव्य पितळी नाग देखील पुजला जातो. चौथीला पुजलेला नाग पंचमीच्या संध्याकाळपर्यंत महासरस्वती समोर असतो. नंतर त्याचं विसर्जन होतं. असा हा जगदंबेच्या मंदिरात रंगणारा नाग पंचमीचा सोहळा यंदादेखिल हा नाग असाच विराजमान होईल.
महांकाली मंदिरातील नागकुंड
करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे शिवाजी पेठ महांकालीजवळ असलेल्या महाकाल कुंडाजवळ देखील नागांचे स्थान आहे. या ठिकाणी जो कोणी नागपंचमीला पूजा करेल त्याला संततीसंपत्ती प्राप्त होईल, असे वरदान करवीर महात्म्यात आहे. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात.
नागाळा पार्कातल्या नाग मंदिरात तर स्वत: नागांनी स्थापन केलेल्या नागेश्वर महादेवाचे स्थान आहे. त्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप येते. याशिवाय कोल्हापूर शहरात अनेक जुनी नवीन नाग मंदिरं आहेत. अनेक जुन्या वाड्यांच्या वास्तूंच्या भिंतीमध्ये दगडी नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. याशिवाय घरोघरी मातीच्या नागांचेदेखील मोठ्या थाटाने पूजन होते.