अंबाबाईचे दर्शन आजपासून पूर्ववत सुरु
कोल्हापूर :
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार करवीर निवासिनी अंबाबाईच्या गर्भगृहाची स्वच्छता व इतर सुचनांची पूर्तता केली. पुरातत्व विभागाने कोल्हापुरात येऊन मूर्तीचे रासायनिक संवर्धन केले होते. बुधवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेल्या कामाची पाहणी केली. त्यामुळे आज (दि. 14) पासून धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर अंबाबाईचे दर्शन पूर्ववत करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
अंबाबाई संपूर्ण देशातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ऐतिहासिक व धार्मिक दृष्टीने महत्त्वाची अंबाबाई मूर्ती आहे. या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून वेळोवेळी तज्ञ समितीच्या माध्यमातून तपासणी व देखभाल केली जाते. या संवर्धन प्रक्रियेमुळे मूर्तीचे आयुष्य वाढून ती भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापक समितीचे प्रशासक अमोल येडगे आहेत. त्यांनी अंबाबाई मूर्तीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांना कळविले होते. करवीर निवासिनी अंबाबाई मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी संवर्धन प्रक्रिया सुरु होती. सर्वेक्षण समितीकडून 11 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर संवर्धन प्रक्रीयेचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरु केले. हे काम मंगळवारी रात्री उशिरा पूर्ण झाले होते. तरीही पुरातत्व विभागाच्या सूचनेची अंमलबजावणी करीत बुधवारी अंबाबाई मंदिरातील स्वच्छता केली. या कामांची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली. परंतू धार्मिक विधी सकाळी करायची असल्याने गुरूवारी सकाळी या धार्मिक विधी होणार आहेत. त्यानंतर अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे.
- भाविकांनी उत्सव मूर्तीसह तत्व कलशाचे घेतले दर्शन
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही बुधवारी दिवसभर मुख्य गाभारा भाविकांसाठी बंद ठेवण्यात आला. संवर्धन प्रक्रियेनंतर समितीने सुचवलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही बुधवारी मंदिरात सुरू होती. त्यामुळे भाविकांना गाभाऱ्यातील मूळ मूर्तीचे दर्शन घेता आले नाही. त्याऐवजी पेटी चौकात प्रतिष्ठापित उत्सव मूर्ती व देवी तत्व कलशाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दिवसभर लांबच लांब रांगा लागत होत्या.