अमेझॉन गुंतवणार 35 अब्ज डॉलर्स
भारतात 10 लाख नवे रोजगार निर्माण होणे शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
व्यापार क्षेत्रातील प्रख्यात कंपनी अमेझॉनने भारतात 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक 2030 पर्यंत केली जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे भारतात 10 लाख नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय रुपयात ही गुंतवणूक 3.14 लाख कोटी रुपये इतकी होणार आहे.
अमेझॉनच्या ‘संभव’ परिषदेत ‘उगवत्या बाजारपेठा’ विभागाचे उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी ही गुंतवणूक आणि तिचे उद्देश यांच्यासंबंधी माहिती दिली आहे. अमेझॉन कंपनी सध्या भारतातून 20 अब्ज डॉलर्सची निर्यात करीत आहे. या निर्यातीत येत्या पाच वर्षांमध्ये चौपट, म्हणजेच 80 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. यामुळे भारतात नवे 10 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. हे रोजगार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, स्थायी आणि अस्थायी अशा स्वरुपांचे असतील. अमेझॉन कंपनीने भारतात 2010 पासून आतापर्यंत 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. येत्या पाच वर्षांमध्ये या गुंतवणुकीत आणखी 35 अब्ज डॉलर्सची भर पडणार आहे. ही गुंतवणूक कंपनीच्या भारतातील सर्व व्यवसायांमध्ये मिळून होणार आहे, अशी आश्वासक माहिती अग्रवाल यांनी बुधवारी दिली आहे.
मायक्रोसॉफ्टच्या दुप्पट गुंतवणूक
भारतात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्ट या कंपनीने मंगळवारी केली आहे. अमेझॉनची ही प्रस्तावित गुंतवणूक मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीपेक्षा जवळपास दुपटीने मोठी आहे. मायक्रोसॉफ्टने 2016 ते 2022 या सहा वर्षांच्या कालावधीत भारतात 3.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, असे दिसून येत आहे.
व्यवसाय विस्तारासाठी गुंतवणूक
अमेझॉन कंपनीने भारतात आतापर्यंत केलेली गुंतवणूक स्थावर आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण कार्यासाठी केली आहे. फुलफिलमेंट सेंटर्स, वाहतूक जाळे, विदा केंद्रे, डिजिटल पेमेंटस्, तंत्रज्ञान विकास आणि अन्य पायाभूत सुविधांचा विकास यांच्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग केला गेला आहे. यापुढची गुंतवणूकही कंपनी आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी करणार आहे, असे स्पष्ट केले गेले.
असंख्य व्यवसायांचे डिजिटायझेशन
अमेझॉनने भारतात आतापर्यंत 1 कोटी 20 लाख छोट्या-मोठ्या व्यवसायांचे डिजिटायझेशन केले आहे. याच्या योगे कंपनीने भारतातून 20 अब्ज डॉलर्सच्या ई-व्यापार निर्यातीचे लक्ष्य साध्य केले आहे. या गुंतवणुकीतून 28 लाख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.
भारतातून निर्यात वाढविणार
भारतातून होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात वाढविण्याचे अमेझॉनचे ध्येय आहे. त्यासाठी कंपनीने भारतात लक्ष्यकेंद्री उत्पादन केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रांची संख्या आगामी काळात वाढविली जाणार आहे. भारतातील उत्पादक यशस्वी जागतिक निर्यातदार व्हावेत, यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांची व्याप्ती आगामी काळात वाढविण्यात येणार आहे. अमेझॉनने आपल्या ‘संभव परिषदे’त भारताच्या वस्त्रप्रावरणे निर्यात प्रोत्साहन मंडळाशी महत्वाचा करार केला असून या कराराच्या अंतर्गत देशव्यापी निर्यात उपक्रम हाती घेतला जाणार आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.
दहा क्लस्टर्स स्थापन करणार
अमेझॉन आगामी पाच वर्षांमध्ये भारतात 10 उत्पादन क्लस्टर्स स्थापन करणार आहे. ही क्लस्टर्स तिरुपूर, कानपूर, सुरत तसेच इतर 7 शहरांच्या नजीक स्थापन करण्यात येणार आहेत. ही निर्यातप्रधान उत्पादन संकुले असतील. त्यांच्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती आहे.
विस्ताराची व्यापक योजना
ड अमेझॉन येत्या पाच वर्षांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात व्यवसाय विस्तारणार
ड भारतात 10 शहरांनजीक कंपनी 10 निर्यात उत्पादन संकुले स्थापन करणार
ड 2030 पर्यंत कंपनी भारतातून होणारी निर्यात 80 अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार
ड भारताच्या छोट्या आणि मध्यम उद्योगांना निर्यातप्रधान बनविण्यासाठी प्रयत्न