अमेझॉनचे मालक बेझोस विवाह बंधनात
इटलीतील व्हेनिसमध्ये शाही थाट : 425 कोटींहून अधिक खर्च : निमंत्रितांमध्ये देश-विदेशातील ‘व्हीव्हीआयपी’
वृत्तसंस्था/ व्हेनिस
अमेझॉनचे मालक आणि जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस शुक्रवार, 27 जून रोजी पत्रकार लॉरेन सांचेझ यांच्याशी विवाह बंधनात अडकले. राजे आणि सम्राटांचा विवाहही फिके पडू शकेल असा हा शाही विवाह सोहळा इटलीच्या व्हेनिस शहरात संपन्न झाला. ‘टेक मॅग्नेट’ जेफ बेझोस यांच्या लग्नात व्हीव्हीआयपी पाहुण्यांची वर्दळ दिसून आली. त्यांचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण व्हेनिसला विशेष सुरक्षा कवच पुरविण्यात आले होते. हा तीन दिवसांचा भव्य विवाह सोहळा गुरुवारपासून सुरू झाला आहे. या समारंभाचे वर्णन ‘शतकातील सर्वात आलिशान विवाह सोहळा’ असे करण्यात आले आहे.
61 वर्षीय जेफ बेझोस सध्या आपल्या विवाह सोहळ्यात व्यग्र आहेत. विशेष म्हणजे हे लग्न कोणत्याही सामान्य सोहळ्यासारखे नसून सुमारे 388 कोटी ते 464 कोटी रुपये इतक्या प्रचंड खर्चाची उधळण होत आहे. या सोहळ्यामुळे इटलीतील व्हेनिस शहर चर्चेत आले आहे. हा विवाह शहरातील सर्वात महागड्या हॉटेल्स आणि नौकांमध्ये सुरू आहे. यामध्ये बेझोसची स्वत:ची लक्झरी नौका ‘कोरू’ देखील समाविष्ट आहे. या हाय-प्रोफाईल सोहळ्याला हॉलिवूड, व्यवसाय, राजकारण आणि वित्त जगातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहतील. या समारंभाला सुमारे 200 ते 250 व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मिक जॅगर, इवांका ट्रम्प, ओप्रा विन्फ्रे आणि लिओनार्डो डिकॅप्रियो सारखे प्रतिष्ठित पाहुणे या समारंभाला उपस्थित आहेत. कॅमेऱ्यांनी कैद केलेल्या विवाह सोहळ्याशी संबंधित फोटोंमध्ये जॉर्डनची राणी रानिया, अमेरिकन फुटबॉल खेळाडू टॉम ब्रॅडी, अमेरिकन फॅशन डिझायनर स्पेन्सर अँटल, गायिका अशर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचा सहभाग दिसून आला. विवाहासाठी दाखल झालेल्या निमंत्रितांना घेऊन व्हेनिसच्या मार्को पोलो विमानतळावर किमान 95 खासगी विमाने उतरल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
व्हेनिस शहरात अनेक व्हीआयपींची लग्नगाठ
व्हेनिस हे जगातील सर्वात जुने चित्रपट महोत्सवाचे घर आहे आणि स्पीड बोटींमध्ये प्रवास करणाऱ्या व्हीआयपींसाठी ओळखले जाते. 2014 मध्ये हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लूनीचे स्टार-स्टडेड लग्न येथे झाले होते. व्हेनिस शहराने अनेक व्हीआयपी लग्नांचे आयोजन केले आहे. अमेरिकन अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि मानवाधिकार वकील अमल अलामुद्दीन यांनी 2014 मध्ये येथे विवाहबद्ध झाले. तर भारतीय अब्जाधीश विनिता अग्रवाल आणि मुकीत तेजा यांनी 2011 मध्ये येथे लग्न केले.
पत्नी सांचेझसाठी 27 ड्रेस...
बेझोस आणि सांचेझ बुधवारी हेलिकॉप्टरने व्हेनिसमध्ये पोहोचल्यानंतर आलिशान अमन हॉटेलमध्ये थांबले होते. येथील ग्रँड कॅनालचे दृश्य असलेल्या खोल्यांसाठी दररोज किमान 4,000 युरो (40,000 रुपये) खर्च येतो. जेफची होणारी पत्नी सांचेझने समारंभात घालण्यासाठी 27 ड्रेसेसची निवड केली आहे. गुरुवारी बेझोस आणि सांचेझ राहत असलेल्या अमन हॉटेलमधून प्रसिद्ध इटालियन डिझायनर डोमेनिको डोल्से बाहेर पडताना दिसल्या.