अवकाशातील अद्भुत शस्त्रक्रिया
साधारणत: शस्त्रक्रिया ही माणसावर किंवा जनावरावर केली जाते अशी आपली समजूत आहे. ती खरीही असते. कारण पृथ्वीवर माणसे आणि प्राणी सोडून अन्य कोणावरही शस्त्रक्रिया केली जात नाही. तथापि, संशोधकांनी अंतराळात एक अशी शस्त्रक्रिया केली आहे, की जिची सर्वसामान्य माणूस कल्पनाही करु शकणार नाही. मात्र, या प्रयोगामुळे पृथ्वीवरच्या शस्त्रक्रियांमध्ये क्रांती होईल, अशी अपेक्षा आहे.
ही शस्त्रक्रिया केली आहे, चक्क एका यंत्रमानवाने. या यंत्रमानवाचे नाव आहे, स्पेसमीरा. या यंत्रमानवाची निर्मिती अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठाने केली असून त्याच्या निर्मितीला व्हर्चुअल इन्सिजन या संस्थेने साहाय्य केले आहे. या यंत्रमानवाला गेल्या महिन्याच्या अखेरीस ‘नासा’च्या अंतराळातील अवकाश स्थानकात (स्पेस स्टेशन) पाठविण्यात आले होते. त्याला प्रस्थापित करण्याचे काम अवकाश स्थानकातील एका अंतराळवीराने केले. या यंत्रमानवाने एका रबरी बाहुलीवर या अवकाश स्थानकात ही शस्त्रक्रिया केली. या रबरी बाहुलीची रचना मानवासारखीच होती. या यंत्रमानवाने स्वत: शल्यचिकित्सक असल्याच्या थाटात ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या यंत्रमानवावर पूर्ण नियंत्रण पृथ्वीवरील प्रयोगशाळेतून ठेवण्यात आले होते, हे या शस्त्रक्रियेचे आणखी एक वैशिष्ट्या आहे.
पृथ्वीवरुन अंतराळात केली गेलेली ही प्रथम शस्त्रक्रिया आहे. हे अत्यंत मोठे यश आहे, असे संशोधक मानत आहेत. भविष्यकाळात अशा प्रकारे यंत्रमानवाच्या साहाय्याने पृथ्वीवर तसेच रुग्णाला अंतराळात नेऊन दूरनियंत्रण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. अंतराळात शस्त्रक्रिया केल्यास रक्तस्त्राव कमी होतो असे संशोधकांचे म्हणणे आहे. पृथ्वीवरही यंत्रमानवाच्या हातून शस्त्रक्रिया करुन घेतल्यास ती अधीक अचूक आणि वेगवान पद्धतीने होते, असेही मानण्यात येत आहे. अर्थात, हे प्रयोग अद्याप बाल्यावस्थेत आहेत. त्यांचे व्यावसायीकरण होण्यासाठी अद्याप बराच कालावधी लागणार आहे. तथापि, शस्त्रक्रिया विज्ञानात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे.