अजब दुनियेच्या...गजब कथा...
सह्याद्रीच्या पर्वतरांगात खूप मोठ्ठं जंगल होतं. घनदाट झाडी होती. या जंगलात खूप प्रकारचे प्राणी, पक्षी, किडे गुण्यागोविंदाने राहत होते. या जंगलाचा राजा सिंह देखील तिथेच होता. सगळ्यांनाच भीती वाटेल असं त्यांचं रंगरूप, अक्राळविक्राळ रूप होतं. त्याची डरकाळी ऐकली की सगळं जंगल थरथर कापायला लागायचं. पक्षी घाबरून फडफडत झाडावरून उडत जायचे. माकडं झाडांवर उड्या मारत धुमाकूळ घालायचे. बरेच प्राणी घाबरून आपल्या सुरक्षेसाठी कुठेतरी लपून बसायचे. असा हा जंगलचा राजा आता हळूहळू म्हातारा होऊ लागला होता. त्याला स्वत: शिकार करून खाता येत नव्हतं. ओरडता तर मुळीच येत नव्हतं. त्याची मुलं बाळं मोठी होऊन दुसऱ्या जंगलात निघून गेली होती. कायम दरारा दाखवणाऱ्या सिंहाच्या वाट्याला म्हातारपणीचा एकटेपणा येईल याचा विचारसुद्धा कधी आला नव्हता. पण हा एकटेपणा किती भयंकर असतो याची मात्र आता त्याला कल्पना यायला लागली होती. त्याची ही अवस्था आजूबाजूच्या प्राणी पक्षांना कळली म्हणून ते त्याला सहकुटुंब भेटायला गुहेत येऊ लागले, त्याचे मनोरंजन करू लागले. त्याची चौकशी करू लागले, पण हे भेटायला गेलेले प्राणी, पक्षी परत बाहेर येताना मात्र काही दिसायचे नाहीत. म्हणजे गुहेत जाणारी पावलं दिसायची पण परत येणारी नसायची. बाकीच्या प्राण्यांना हळूहळू याचीसुद्धा भीती वाटू लागली. आपणही परत आलोच नाही तर? सगळेच जण घाबरून पसार झाले. पण एक दिवस सशाने शोध घ्यायचा विचार केला. हळूहळू पाय न वाजवता गुहेत आला. नेमकं काय चाललंय हे तरी पहावं म्हणून बघू लागला. आत गेल्यानंतर त्याला वेगळेच चित्रं दिसलं. एका मोठ्या खड्ड्यात सिंह महाराज झोपले होते आणि शेवटचे श्वास घेत होते. म्हणजे सिंह महाराज आपल्याला सोडून जाणार! अरेरे, आता काही खरं नाही हे त्याच्या लक्षात आलं. ससा तसाच मागे आला आणि त्या गुहेमध्ये इकडे तिकडे बघू लागला. त्याला कोणत्याही प्राण्यांची हाडे दिसली नाहीत. उलट गुहेमधून दुसरीकडे जाणारा एक गुप्त रस्ता दिसला. त्याने त्या रस्त्याने जाऊन पाहिले तो रस्ता थेट पलीकडे दुसऱ्या जंगलात जाऊन उघडत होता. ससा पुन्हा माघारी आला आणि सगळ्यांना त्याने ही गोष्ट मोठ्या आवडीने सांगितली. आपण उगीचच एखाद्याबद्दल चुकीचा विचार करतो. सिंहाच्या गुहेत जाणारी पावले दिसतात असं आम्ही म्हणतो पण तिथे नेमकं काय घडलं ते आता इतरांना सांगितलं. सिंह महाराज वृद्धावस्थेला आल्यानंतर त्यांना कोणीतरी खायला आणून देईल म्हणून ते कधीच आशेवर बसले नाहीत. कारण सिंह दुसऱ्यांनी केलेली शिकार कधीच खात नसतो. तो स्वत: शिकार करून मगच खातो. उलट सिंहाने केलेल्या शिकारीवर कोल्हे कुत्र्यासारखे प्राणी नेहमी पोसले जात असतात. अशा या सिंहाला म्हातारपणी एकांतवास बरा वाटला. म्हणून त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून त्यांचा निरोप घेतला आणि त्या लोकांना दुसऱ्या जंगलात जायला रस्ता दाखवला. जंगलातले बरेचसे प्राणी आपल्या मृत्यू समयी असा अज्ञातवास, एकांतवास स्वीकारतात आणि गुपचूप या जगातून निघून जातात. आम्ही माणसं मात्र वेगळेच विचार करत काहीतरी वेगळंच लिहित बसतो.