For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरपेक्ष कर्म करणारा योगी ब्रह्मरूप होतो

06:05 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
निरपेक्ष कर्म करणारा योगी ब्रह्मरूप होतो
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

बाप्पा म्हणाले, काही लोकांना कर्मत्याग व कर्मयोग वेगवेगळे वाटतात कारण त्यांनी दोन्हींबद्दल नीट समजून घेतलेलं नसतं. वास्तविक पाहता कर्मत्याग करून संन्यास घेणाऱ्या व्यक्तीने कर्मत्याग केलेला नसून फळाचा त्याग केलेला असतो. तर कर्मयोगी व्यक्ती कर्म करते पण फळाची अपेक्षा करत नाही. अशा पद्धतीने दोघेही कर्म करून फलत्याग करतात. साहजिकच दोघांनाही कोणतीही अपेक्षा नसल्याने मोक्ष मिळतो पण यातील कर्मसंन्यास आचरायला जास्त अवघड आहे. त्यामानाने कर्मयोग सोपा आहे हे सर्व जो समजून घेईल त्याला योग कळला असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

यदेव प्राप्यते त्यागात्तदेव योगतऽ फलम् ।

Advertisement

संग्रहं कर्मणो योगं यो विन्दति स विन्दति ।। 5 ।।

अर्थ-त्यागापासून जे प्राप्त होते तेच फल कर्मयोगापासून मिळते. कर्माचा संग्रह हाच योग होय. हा ज्याला प्राप्त होतो त्याला ब्रह्म प्राप्त होते.

विवरण-कर्मसंन्यास व कर्मयोग या दोन्ही मार्गानी जाणाऱ्यांना मोक्ष मिळतो. जो कर्मसंन्यास घेतो त्याला कोणतंही कर्म आपणहून करण्याची गरज वाटत नसते. जेव्हा ईश्वरी प्रेरणा होईल तेव्हा त्याच्या हातून आपोआपच कर्म घडते. ह्या कर्माचे स्वरूप त्याच्याकडून ज्याला ज्ञानोपदेश मिळणार असतो त्याच्यापर्यंत जाऊन त्याला उपदेश करणे असे असते. त्याच्या उदरनिर्वाहाची काळजी स्वत: बाप्पा घेत असतात. केवळ ज्ञानसाधना हे त्याचे एकमेव ध्येय असते.

अर्थात असा साधक अत्यंत श्रेष्ठ प्रतीचा योगी असतो पण हे काहीही लक्षात न घेता आपणही कर्माचा त्याग करून कर्मसंन्यास घेतला की सुटलो असं जर कुणाला वाटत असेल तर ते मात्र चुकीचं आहे कारण संन्यास घेतल्यावर मनात कोणतेही विचार येऊन उपयोग नाहीत आणि ही निर्विचार समाधीअवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागते. म्हणून जनसामान्यांच्या दृष्टीने कर्मयोग उत्तम आहे. यामध्ये संसारात राहून कर्म करण्याचा आनंद आहे. त्याच्या हातून लोककल्याणकारी कार्य सतत होत असते. तो स्वत:चही हित साधतो व लोकांचंही भलं करतो. हा कर्मसंन्यास व कर्मयोग यातील फरक ज्याला समजला त्याला सर्व समजलं, असं म्हणता येईल.

बाप्पा पुढं म्हणतात की, कर्माचा त्याग केला की संन्यास घेतला असं होत नाही. ज्याला निर्विचार समाधीअवस्था साध्य झाली त्याला ब्रह्मप्राप्ती होते तसेच निरपेक्ष कर्म करणाऱ्यालाही ब्रह्मप्राप्ती होते.

केवलं कर्मणां न्यासं संन्यासं न विदुर्बुधाऽ ।

कुर्वन्ननिच्छया कर्म योगी ब्रह्मैव जायते ।। 6 ।।

अर्थ- कर्माचा केवळ त्याग म्हणजे संन्यास नव्हे असे ज्ञाते जाणतात पण इच्छारहित कर्म करणारा योगी ब्रह्मच होतो.

विवरण- काही लोक मुळातच आळशी असतात तर काहींना वाट्याला आलेलं काम आवडत नसल्याने त्यांना ते टाळून आळसात राहायला आवडतं. मग ते संन्यासाच्या नावाखाली कर्म करायचं टाळतात. म्हणजे थोडक्यात अंगचोरपणा करतात पण असं करून तमोगुणाची वाढ करण्यापलीकडे काहीच साध्य होत नाही. बाप्पांच्याकडे ह्या त्यांच्या वर्तणुकीची नोंद असल्याने ते अशा व्यक्तीची रवानगी मृत्यूनंतर नरकात करतात. म्हणून असं वागण्याला जाणकार लोक संन्यास मुळीच म्हणत नाहीत. संन्यासी व्यक्तीला मनापासून संसाराची आवड नसते. त्यामुळे त्यांना मुद्दामहून संसाराचा, संसारिक कर्मांचा त्याग करावा लागत नाही. ते त्यांच्याकडून स्वाभाविकपणे घडते. कोणतीही गोष्ट स्वाभाविकपणे केली की, केलेल्या गोष्टीचे विचार पुन्हा मनात येत नाहीत. उदाहरणार्थ एखाद्याने मनापासून काही दिलं तर आपण काही दिलंय असे विचारसुद्धा मनात येत नाहीत कारण त्याला त्या गोष्टीच्या परतफेडीची अपेक्षा नसते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.