कावळ्यांची आश्चर्यकारक बुद्धी
कावळा हा पक्षी माणसांच्या आसपासच राहणारा असला तरी माणसाला त्याचे फारसे कौतुक नसते, ही वस्तुस्थिती आहे. कावळा इतर सर्वसामान्य पक्षांप्रमाणे किरकोळ बुद्धीमत्तेचा असतो अशी बहुतेक माणसांची समजून असते. कावळ्याचे महत्व ‘पिंडाला शिवण्याच्या’ वेळी मात्र, अचानक वाढलेले असते. या प्रसंगाखेरीज त्याला फारसे महत्व देण्याची माणसांची इच्छा नसते. तथापि, कावळे आपण समजतो तसे सामान्य नसून अतिशय बुद्धीमान असतात, असे अनेक प्रसंगांवरुन दिसून येते. त्यांची बुद्धी संगणकासारखी चालते असे संशोधकांचे म्हणणे आहे.
कावळ्याला काही कामांचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. युरो न्यूज या प्रसारमाध्यमाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कावळ्यांवर एक प्रयोग करण्यात आला आहे. फ्रान्समधील पक्ष्यांसाठी आरक्षित असलेल्या एका ‘थीम पार्क’ मधील कावळ्यांना माणसांनी टाकलेली सिगारेट्सची थोटके उचलण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पडलेल्या इतर छोट्या वस्तूही उचलण्याचे तंत्र त्यांना शिकविण्यात आले. ही थोटके किंवा छोट्या वस्तू उचलून कावळे त्या खात नव्हते, तर त्यांना एका यंत्रामध्ये आणून टाकत होते. या यंत्रातून नंतर कावळ्यांसाठी खाद्य बाहेर पडत असे. त्याचा आस्वाद हे कावळे घेताना दिसून येत असत.
थोडक्यात, ज्याप्रमाणे कॉफी व्हेंडिंग मशिनमध्ये नाणे टाकले की कॉफी बाहेर पडते, तशा प्रकारे उद्यानातील थोटके आणि टाकावू वस्तू यंत्रात टाकून आपले अन्न मिळविण्याचे तंत्र या कावळ्यांनी शिकून घेतल्याचे दिसून आले. यावरुन कावळ्यांची बुद्धीमत्ता अतिशय तीव्र असल्याची माहिती संशोधकांना मिळाली. भांड्याच्या तळाशी असणारे पाणी तहानलेल्या कावळ्याने भांड्यात छोटे खडे टाकून कसे मिळविले ही कथा आपण लहानपणी ऐकलेली असते. ती काल्पनिक मानण्याचे कारण नाही, असे या संशोधनावरुन दिसून येते.