अप्रतिम कलाकुसर... लक्षवेधी मखर
बेळगाव : आपला लाडका गणराया घरी येण्यासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. गणरायाच्या स्वागतामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी गणेश भक्तांकडून जोमात खरेदी सुरू आहे. यावर्षी थर्मोकोलसोबत इकोफ्रेंडली पुठ्ठ्यांचे मखर विक्रीसाठी आले आहेत. त्याचबरोबर कपड्यांमध्ये तयार केलेले मंडप गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. खडेबाजार, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, भेंडीबाजार, कडोलकर गल्ली, मेणसी गल्ली, भातकांडे गल्ली, रामदेव गल्ली या भागामध्ये गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेले साहित्य विक्री करण्यात येत होते.
सजावटीच्या साहित्यासह गणरायाच्या आसनासाठी मखर खरेदी केले जात होते. गणेशचतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने तयारीला वेग आला आहे. मागील सात-आठ वर्षांपासून थर्मोकोलचे मखर विक्री केले जात होते. परंतु थर्मोकोल हा अविघटनशील असल्यामुळे मागील दोन-तीन वर्षात याचा वापर कमी झाला आहे. त्याऐवजी बाजारामध्ये इकोफ्रेंडली मखर विक्रीसाठी आले आहेत. पुठ्ठा व हार्डशिट यांच्या साहाय्याने तयार केलेले आकर्षक मखर गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही ठिकाणी हार्डशीटमध्ये एलईडी दिवे बसविले असल्याने गणेशमूर्ती अधिकच सुंदर दिसू लागते. 1500 ते 5000 रुपयांपर्यंत हार्डशीटमध्ये मखर उपलब्ध आहेत. थर्मोकोलचे मखर 800 रुपयांपासून ते 4 हजारांपर्यंत विक्री केले जात आहेत.
