आश्चर्यकारक स्तंभ
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांताच्या मोनोकाऊंटी भागात क्रॉली नामक सरोवर आहे. या सरोवराच्या पूर्व तटावर सहस्त्रावदी रहस्यमय स्तंभ आहेत. त्यांना ‘क्रॉली लेक कॉलम्स’ असे म्हणतात. या स्तंभांचा रचना अद्भूत आहे. हे स्तंभ निसर्गाचा चमत्कार मानले जातात. ते केव्हा तयार झाले, कुणी तयार केले आणि का तयार केले. याची उत्तरे आजही अज्ञात आहेत. त्यामुळे या स्तंभांच्या संबंधातील कुतुहल गेली शेकडो वर्षे कायम आहेत. संशोधकांनी या स्तंभांचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक दिवसांपासून चालविलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काही भूगर्भीय प्रक्रियांमुळे सहस्त्रावधी वर्षांपूर्वी हे स्तंभ निर्माण झाले. बरेच स्तंभ 20 फूट किंवा त्याहून अधिक उंच आहेत. अनेक स्तंभ करड्या रंगाचे आहेत.
दोन ते तीन चौरस मैलाच्या परिसरात असे पाच हजारहून अधिक स्तंभ दिसून येतात. त्यांच्या आकारात विविधता आहेत. तशीच त्यांची स्वरुपही भिन्न भिन्न आहेत. काही स्तंभ तांबड्या आणि केशरी रंगाचे आहेत. त्यांचा आकार षटकोनी असून चौकोनी किंवा पंचकोनी आकारातही ते आढळून येतात. प्राचीन मुरीश मंदिरातील स्तंभांप्रमाणेच ते दिसतात. त्यांना पाहण्यासाठी प्रतिवर्षी लक्ष्यावधी पर्यटक क्रॉली सरोवराला भेट देत असतात अशी माहिती देण्यात येते. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठाच्या काही संशोधकांनी त्यांचे संशोधन केले आहे. संशोधकांच्या निष्कर्षानुसार या स्तंभांची निर्मिती जवळपास साडेसात लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखींच्या मोठ्या स्फोटांपासून झालेली आहे. त्यांची रचना ज्वालामुखीतील राख, लाव्हारस आणि इतर द्रव्यांपासून झालेली असून मोठ्या स्फोटामुळे या स्तंभांमध्ये इतकी समानता दिसून येते असे संशोधकांचे म्हणणे आहे.