अतिवृष्टीमुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
बालटाल, पहलगाम येथे रोखण्यात आले भाविक
वृत्तसंस्था/ जम्मू
काश्मीरमध्ये अतिवृष्टी होत असल्याने प्रशासनाने बुधवारी पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांवरील अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे. खराब हवामानामुळे जम्मूमध्ये गुरुवारीही यात्रा स्थगित राहणार आहेल. पहलगाम आणि बालटाल दोन्ही आधार शिबिरांमधून श्री अमरनाथ यात्रा 30 जुलै म्हणजेच बुधवारसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या माहिती तसेच जनसंपर्क विभागाने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. बुधवार सकाळपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बालटाल आणि नुनवान/चंदनवाडी आधार शिबिरांमधून यात्रेची अनुमती देण्यात आली नसल्याचे काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधूडी यांनी सांगितले.
यात्राक्षेत्रात अतिवृष्टीमुळे आधार शिबिरांमधून भाविकांची ये-जा प्रभावित झाली. याचमुळे गुरुवारी भगवती नगर जम्मूमधुन बालटाल आणि नुनवान आधार शिबिरांच्या दिशेने कुठल्याही तुकडीला जाण्याची अनुमती न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रामार्गावरील प्रतिकूल हवामान पाहता खबरदारीदाखल अमरनाथ यात्रेची तुकडी गुरुवारी जम्मूच्या भगवती नगरमधून पुढे जाणार नाही. यात्राक्षेत्रात अतिवृष्टीमुळे काश्मीरमधील आधार शिबिरांमधील भाविकांच्या यात्रेवर प्रभाव पडला असल्याचे जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी सांगितले.
आतापर्यंत 3.93 लाख भाविकांकडून दर्शन
भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारीदाखल यात्रा रोखण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा 9 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. 3 जुलै रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3.93 लाखाहून अधिक भाविकांनी भगवान अमरनाथ गुहा मंदिरात दर्शन घेतले आहे.