एसजीआयएफमध्ये अमन सुणगारला सुवर्ण
उत्कृष्ट कामगिरीमुळे कर्नाटकामध्ये अमन अव्वल
बेळगाव : राजकोट येथे घेण्यात आलेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेळगावच्या अमन सुणगारने 2 सुवर्ण व 2 रौप्य पदके पटकावित राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. राजकोट येथे झालेल्या या स्पर्धेत कर्नाटक जलतरण संघाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये विविध राज्यातून जवळपास 2 हजारांहून अधिक भाग घेतला होता. बेळगावच्या सेंट पॉल्स स्कूलचा विद्यार्थी अमन वसुंधरा अभिजित सुणगार याने 50 मी. बॅकस्ट्रोक व 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये दोन सुवर्ण पदके पटकाविली तर 100 मी. बॅकस्ट्रोक एक तर 4×100 मी. मिडले रिलेमध्ये एक अशी 2 रौप्य पदके पटकाविली. अमनने आपल्या खडतर परिश्रमामुळेच एसजीएफआयसारख्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित यश संपादन केले आहे. तो केएलईच्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात नियमित सराव करीत असून त्याला अक्षय शेरेगार, गोवर्धन काकतीकर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, इम्रान व उमेश यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य व क्रीडा शिक्षक अॅन्थोनी डिसोजा व बाळेश बाळेकाई यांचे त्याला प्रोत्साहन मिळाले.