"मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?"
भुजबळांनी सुनावले खडे बोल
मुंबई
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आता राज्याचा गतीशील कारभार सुरू झाला. या मंत्रीमंडळाच्या विस्तारात अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदे न मिळाल्याने, त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली आहे. या नाराजीनाट्यात भाजपचे सुधीर मुनगंटीवर आणि राष्ट्रवादी छगन भुजबळ यांचे नाव आहे. मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ संतप्त झाले आहेत. भुजबळांनी सोमवारी अनेकवेळा माध्यमांसमोरच याबाबत नाराजी प्रकट केली. त्यानंतर नाशिक येथे पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठक घेतल्यानंतर भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी, मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का ? असं म्हणत छगन भुजबळ यांनी पक्षातील प्रमुखांवर निशाणा साधला. यावेळी भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना बोल सुनावले.
मंत्रिपदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मला नाशिकमधून उभं रहायला सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी तुम्ही लढावे यांसाठी आग्रही असल्याचेही सांगितले. त्यापद्धतीने मी तयारी केली. पण ऐनवेळी आमच्या नेत्यांनी माझे नाव घोषित केले नाही. त्यानंतर मी लोकसभा निवडणूकीतून स्वतः माघार घेतली. मग मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी देण्याचे सांगण्यात आले. मी राज्यसभेवर माझ्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो, असे सांगितले तर तुम्ही महाराष्ट्रात असणं गरजेचे असल्याचे सांगितले. मग आता विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर आता मला राज्यसभेवर जाण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी नितीन पाटील राजीनामा देतील असेही सांगितले आहे. मग मी जेव्हा मागत होतो तेव्हा संधी का नाही दिली. अशा शब्दात नाराजगी व्यक्त केली.
यापुढे भुजबळ म्हणाले, निवडणुका आत्ता कुठं संपल्या आहेत. मला माझ्या मतदार संघातील प्रश्न सोडवायचे आहेत. मी माझ्या लोकांना काय सांगू ? मी लगेच राज्यसभेवर जाऊ शकत नाही. त्यासाठी दोन -तीन वर्ष थांबा. माझा मतदारसंघ जरा स्थिरसावर होऊ दे. मला राज्यसभेवर जाण्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यासाठी आमचे नेते म्हणाले आपणं यावर चर्चा करू, पण ते कधीच चर्चेला बसले नाहीत. असे थेट आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भुजबळांनी केले.