कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कठीण समयीसुद्धा सदैव साथ : भारत-इस्रायल मैत्रीचा भक्कम हात !

06:29 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इस्रायलचे परराष्ट्रमंत्री सी. आर. गिडोन यांनी दोन दिवस भारतीय नेत्यांच्या भेटी घेऊन अनेक मौलिक प्रश्नांवर चर्चा केली. दहशतवादाची बिकट समस्या तसेच युरोप आणि आशिया खंडातील वर्तमान राजकीय प्रश्न, हिंद प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणानंतर निर्माण झालेली परिस्थिती असताना बंडखोरांचे उपद्रव तसेच आर्थिक आणि व्यापारी संबंध इत्यादी अनेक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा घडून आली. त्यामुळे ही भेट दोन्ही लोकशाही राष्ट्रांतील मैत्रीचा सुवर्णबंध अधिक भक्कम आणि मजबूत करणारी ठरली आहे.

Advertisement

Advertisement

इस्रायल या देशाने छळाकडून बळाकडे प्रवास केला आहे. जगाच्या भूमीवर ज्यू लोकांची मातृभूमी कुठे आहे, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणे अवघड होते. परंतु, दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांनी स्वीकारलेल्या समंजस भूमिकेमुळे इस्रायलची भूमी जगात इतरत्र पांगलेल्या ज्यू लोकांसाठी प्रदान करण्यात आली. त्यांनी मोठ्या कष्टपूर्वक तेथे शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, संरक्षण अशा सुविधांचा विकास करून प्रगत आणि आधुनिक इस्रायलची स्थापना केली. या कामी अमेरिकेसारख्या मोठ्या महासत्तेने इस्रायलला उदार दृष्टीने प्रत्यक्ष मदतही केली आणि लष्करी सहकार्यही केले. परंतु, खुद्द चिवट आणि कष्टाळू अशा ज्यू समाजाने जगभराच्या कानाकोपऱ्यांतून येऊन आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी तेथे स्थायिक होऊन विकासाची गरूडझेप घेतली. त्यामुळे इस्रायल एक समर्थ राष्ट्र म्हणून उदयास आले आणि त्याने आपल्या स्वसामर्थ्याने जगाच्या नकाशावर आपले स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले. परंतु, या इस्रायलला शेजारच्या पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने आव्हान दिले तसेच लेबनॉनमधील हुथी संघटनासुद्धा त्यांच्या वाईटावर आहे.

अनेक दहशतवादी गट इस्रायलला संपविण्याची भाषा करतात. परंतु, या राष्ट्राने आपल्या अस्तित्वासाठीचा संघर्ष सातत्याने केला आहे. एक लढवय्या पराक्रमी, तेवढाच स्वबळावर आधारलेला समाज आणि स्वावलंबी व अस्मिता जपणारे राष्ट्र अशी प्रतिमा निर्माण केली आहे. अशा या बलशाली राष्ट्राची मैत्री व सहकार्य म्हणजे एका नव्या सामुदायिक सहकार्याची, लोकशाही व्यवस्थेची प्रचिती आणून देणारी मैत्री म्हटली पाहिजे. भारत-इस्रायल मैत्री ही या समान लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी आणि विकास संस्कृतीची ध्वजा उंच-उंच फडकविणारी मैत्री म्हटले पाहिजे.

महत्त्वपूर्ण अशी भेट

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इस्रायलचे परराष्ट्रमंत्री सी. आर. गिडोन यांनी दोन दिवस भारतीय नेत्यांच्या भेटी घेऊन अनेक मौलिक प्रश्नांवर चर्चा केली. दहशतवादाची बिकट समस्या तसेच युरोप आणि आशिया खंडातील वर्तमान राजकीय प्रश्न, हिंद प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणानंतर निर्माण झालेली परिस्थिती असताना बंडखोरांचे उपद्रव तसेच आर्थिक आणि व्यापारी संबंध इत्यादी अनेक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा घडून आली. त्यामुळे ही भेट दोन्ही लोकशाही राष्ट्रांतील मैत्रीचा सुवर्णबंध अधिक भक्कम आणि मजबूत करणारी ठरली आहे. कृषी, उद्योग, व्यापार तसेच आर्थिक गुंतवणूक, संरक्षण आणि लोकसंपर्क तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा, सेमीकंडक्टर, सायबर सुरक्षा आणि अनेक मौलिक विकास क्षेत्रांचा आढावा उभय नेत्यांनी घेतला.

समान आव्हाने कोणती?

भारत आणि इस्रायल दरम्यान समान आव्हाने कोणती असतील, तर ती लोकशाही मूल्य जपण्याची आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची तसेच विकासाला मानवी चेहरा देण्याची आहेत. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करताना दोन्ही देशांना पूरक माहितीची देवाण-घेवाण करावी लागणार आहे. शिवाय परस्पर हितवर्धक माहितीचे स्त्राsत सर्व स्वरूपांमध्ये दहशतवादाचा समर्थ मुकाबला करण्यासाठी नवनवीन तंत्रे विकसित करावी लागतील. त्यासाठी काय करता येईल, कोणती पावले टाकावी लागतील, याबाबत उभय नेत्यांमधील विचारविनिमय दोघांनाही वरदान ठरला आहे. दहशतवादाबाबतीत शून्य सहिष्णुता हे धोरण दोन्ही देश कटाक्षाने पाळत आहेत आणि समान ध्येय-धोरणे कृतीत आणण्यासाठी दमदार पावले टाकत आहेत आणि त्यानुसार व्यापक जागतिक दृष्टिकोनाचा विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

मध्यपूर्वेतील स्थैर्य

गिडोन यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू अस्थिर आणि तणावग्रस्त मध्य पूर्वेमध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल, हा होता. उभयतांनी तणावग्रस्त पश्चिम आशियातील आणि विशेष करून आखातांतील घडामोडींबद्दल इस्रायलचा दृष्टिकोन आणि विचार यावर रचनात्मक दृष्टीने चर्चा केली. परराष्ट्रमंत्री गिडोन यांनी गाझा-इस्रायलची भूमिका समजावून सांगितली, तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गाझा शांतता योजनेला भारताचा पाठिंबा घोषित केला. ओलिसांच्या परतीचे त्यांनी स्वागत केले तसेच त्यांनी आशा व्यक्त केली की, शांतता योजना टिकाऊ आणि चिरस्थायी कशी होईल, यासाठी ठाम आणि ठोस उपाययोजना करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी जागतिक घडामोडी आणि बहुपक्षीय मंचावर विधायक सहकार्य वाढविण्यासाठी उपयुक्त चर्चा केली.परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळाने सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्था आणि इस्रायलच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामधील प्रशिक्षण योजनांच्या बाबतीत सामंजस्य करारांची देवाण-घेवाण केली. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांच्याशी झालेली चर्चा सुद्धा अनेक नव्या बिंदूंवर प्रकाश टाकणारी ठरली आहे तसेच परराष्ट्र मंत्र्यांनी हायफा चौक येथील स्मारकालाही भेट दिली.

भेटीचे योगदान काय?

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडोन हे उपपंतप्रधान सुद्धा आहेत. त्यांनी भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली. त्यांच्या या भारत भेटीचे फलित काय असेल, तर त्यामुळे भारत व इस्रायल यांच्यातील विधायक सहकार्याला आता एक नवे वळण लागले आहे. दोन्ही देशांची विकासातील भागीदारी आता उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा या क्षेत्रांतील सहकार्याचे नवे युग निर्माण करत आहे. विशेषत: भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात एक दमदार पाऊल टाकले आहे. याबाबतीत इस्रायलचा अनुभव भारताला पथदर्शक आणि प्रेरक ठरणारा आहे. शिवाय दहशतवादाशी मुकाबला करताना दोन्ही देश खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी समर्थ झाले आहेत.

इस्रायलने मोसाद ही गुप्तहेर संघटना अत्यंत कुशलतेने आणि उत्तम प्रकारे विकसित केली आहे. अनेक वेळा भारत इस्रायलकडून याबाबतीत सहकार्य घेत असतो. भविष्यकाळात सुद्धा उभय देशांचे गुप्तचर यंत्रणांच्या बाबतीतील सहकार्य यापुढेही चालू राहणार आहे. शिवाय कृषी, उद्योग, शिक्षण आणि सुरक्षा तसेच आरोग्य या क्षेत्रांतसुद्धा दोन्ही देश परस्परपूरक ठाम आणि ठोस भूमिका घेऊन विकासाचे एक नवे पर्व पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गिडोन यांच्या भारतभेटीचे सार कशात असेल, तर रचनात्मक भागीदारी आणि पश्चिम आशियातील शांतता व स्थैर्य यावर भर देण्यात आहे.

या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की, भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना आता 33 वर्षे पूर्ण होत आहेत आणि भविष्यकाळात हे संबंध अधिक परिदृढ आणि मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. दोन्ही देशांना भविष्यात कृषी, उद्योग तसेच शिक्षण आणि सुरक्षा तसेच विविध संरक्षण उत्पादनांची गुणवत्ता याबाबतीत अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत परस्परांत करार-मदार करून अत्यंत विश्वासाने पुढे जावयाचे आहे, या दृष्टीने गिडोन यांचा भारत दौरा एक आश्वासक कृती, प्रेरक आणि तेवढाच भक्कम सहकार्याचा विश्वास प्रकट करणारा ठरला आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातील परस्पर सहकार्यामुळे उभय देशांच्या सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्थेस एक नवी दिशा लाभणार आहे, यात शंका नाही. कठीण समयीसुद्धा सदैव साथ आणि मदतीचा हात देणारी भारत-इस्रायल मैत्री म्हणजे एक नवा सुवर्णबंध म्हटला पाहिजे. हा सुवर्णबंध दोन्ही देशांना विकास, ऐश्वर्य आणि समृद्धीकडे घेऊन जाणारा ठरेल, यात शंका नाही.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article