असेही एक गणेशमंदीर
सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूमधाम होत आहे. ती येत्या मंगळवारपर्यंत, अर्थात, अनंतचतुर्दशीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे सारे वातावरण भगवान गणेशाच्या सान्निध्याने भारुन गेलेले आहे. गणेश ही भारतातीलच नव्हे, तर जगाच्या इतर देशांमध्येही भक्तीभावाने पूजली जाणारी देवता आहे. भारतातही प्रत्येक राज्यात गणेशमंदीरे असून त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या कथाही आहेत. छत्तीसगड राज्यातील कांकेर येथे असेच एक प्रसिद्ध गणेश देवालय आहे.
हे देवालय तसे फार प्राचीन म्हणता येणार नाही. कारण त्याची स्थापना 100 वर्षांपूर्वी झाली आहे. तथापि, हे मंदीर अतीव आस्था आणि भावनांचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. येथे प्रत्येक मंगळवारी भगवान गणेशांना महावस्त्र अर्पण केले जाते. तसेच खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो आणि ती खिचडी महाप्रसाद म्हणून भक्तांना वाटली जाते. या गणेशदर्शनासाठी रायपूर, बिलासपूर, धमतरी, दुर्ग, राजनंदगाव तसेच छत्तीगडच्या इतर जिल्ह्यांतून सहस्रावधी गणेशभक्त येत असतात. या गणपतीचे वैशिष्ट्या असे की त्याचे हनुमानाशी अत्यंत निकटचे संबंध आहेत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. याच कारणामुळे मंगळवार हा या गणपतीचा वार म्हणून मानला जातो. कारण उत्तर भारतात भगवान हनुमानाचा वार आपल्यासारखा शनिवार नसून मंगळवार असतो. हनुमानाला प्रिय असणारा हा गणपती कदाचित अशा प्रकारचा प्रथमच गणपती असावा.
हा गणेश कसा स्थापित झाला, याची एक रोचक कहाणी आहे. कांकेरच्या राजघराण्यातील राजवाड्याच्या जलाशयात या गजननाची मूर्ती तरंगताना आढळली होती. ती जलाशयातून बाहेर काढण्यात आली. नंतर तिची प्राणप्रतिष्ठा संबळपूर येथे करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मूर्तीला संबळपूर येथे नेण्यासाठी बैलगाडीत ठेवण्यात आले. हा सात किलोमीटरचा प्रवास होता. मूर्ती तशी लहान होती. तथापि, बैलगाडी काही अंतर गेल्यानंतर अचानक तिचे एक चाक तुटले. मग मूर्ती दुसऱ्या बैलगाडीत ठेवण्यात आली. पण काही अंतर प्रवास केल्यानंतर त्या बैलगाडीचे चाकही तुटले. अशा प्रकारे सात किलोमीटरचा प्रवास पूर्ण होण्याच्या आधीच प्रवासात 12 बैलगाड्याची चाके तुटली. त्यानंतर ही मूर्ती हललीच नाही. त्यामुळे तेथेच मंदीर उभे करण्यात आले. अशा प्रकारे या गणपतीची स्थापना झाली आहे. छत्तीसगड राज्यात सर्वात लोकप्रिय गणेश मंदीर असा याची ख्याती आहे.