असेही एक ‘महिलाराज’
भारतात अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये पती आपले वेतन दरमहा आपल्या पत्नीच्या हाती ठेवतात आणि पत्नी त्यातून घर चालवते, अशी पद्धत आहे. काही घरांमध्ये कमावते मुलगे आपल्या आईच्या हाती सर्व वेतन ठेवतात. घरकाम करणारी पत्नी किंवा माता ही गृहलक्ष्मी मानली जाते. त्यामुळे तिच्या हाती घरखर्चाची सूत्रे ठेवण्याची प्रथा भारतात जुन्या काळापासून असल्याचे दिसते.
मात्र, केवळ भारतातच अशी प्रथा आहे, असे समजण्याचे कारण नाही. भारताव्यतिरिक्त जपानमध्येही अशी प्रथा आहे. तेथे तर घरात ‘महिलाराज’ भारतापेक्षाही अधिक कडक आहे. येथे पत्नी किंवा माता आपल्या पतीला किंवा मुलाला त्याच्या खर्चासाठी पॉकेटमनी देते. मुलाला किंवा पतीला आपले सर्व वेतन माता किंवा पत्नीच्या हाती दर महिन्याला न चुकता ठेवावे लागते. याच पैशातून पती किंवा मुलाला पॉकेटमनी दिला जातो. घरच्या पुरुषाला केवळ पैसे कमावणे एवढेच काम असते. त्या पैशाचा विनियोग करा करायचा, यावर त्याचा कोणताही अधिकार असत नाही. अशी प्रथा जपानमधील जवळपास 75 टक्के घरांमध्ये आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या प्रथेचे कारण शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. त्यातून असे निष्पन्न झाले आहे, की जपानमध्ये पुरुषाने पैसे कमवायचे आणि महिलांनी घराबाहेर जाऊन नोकरी किंवा व्यवसाय न करता केवळ गृहिणीचे उत्तरदायित्व स्वीकारायचे अशी या देशात इतिहासकाळापासून प्रथा आहे. आता कालचक्र परिवर्तीत झाले असले, तरी ही प्रथा मात्र पूर्वीप्रमाणेच निष्ठेने पाळली जात आहे. महिला कमवत नसल्याने त्या पुरुषांच्या संपूर्ण वेतनावर आपला अधिकार आहे असे मानतात. त्यामुळे अनेक घरांमध्ये पुरुषांची अवस्था ‘पैसा घरात आणणारे यंत्र’ अशी झाली आहे. या प्रथेमुळे पुरुष आपल्या कह्यात राहतात असे महिलांचे म्हणणे आहे. ही सामाजिक प्रथा पुरुष आणि महिला या दोघांनीही स्वेच्छेने स्वीकारली आहे. त्यामुळे ती टिकून आहे, असेही म्हटले जाते.