सुगीबरोबर येळ्ळूर शिवार-परिसरात रब्बी पिकांच्या पेरणीचीही लगबग
वार्ताहर/येळ्ळूर
सुगीबरोबर येळ्ळूर शिवार व परिसरात रब्बी पिकांची पेरणीचीही लगबग सुरू झाली असून सकाळी रब्बी पिकाची पेरणी व नंतर कापणी आणि बांधणी अशी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. येळ्ळूर परिसरातील जमीन ही काळ्या पोताची असून तिच्यात ओलावा धरुन ठेवण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे पावसाळी भातपिकाराबेरच रब्बी पिकांसाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे या परिसरात रब्बीसाठी प्रामुख्याने मसूर, वाटाणा, हरभरा, मोहरी या पिकांबरोबर गहू, ज्वारी, जवस यासारखी पिकेही कमी अधिक प्रमाणात घेतली जातात. या पिकासाठी प्रामुख्याने हवामान थंड लागते.
सुरू झालेली थंडी बघता रब्बी पिकांची उगवण व पोषण चांगल्याप्रकारे होणो असल्याने असलेल्या हंगामाचा लाभ घेत शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीला लागला आहे. पूर्वी रब्बी पेरणीसाठी प्रामुख्याने बैलांचाच वापर व्हायचा. त्यामुळे बीज ठराविक खोलीवर पडायचे. पण काळाच्या ओघात आणि लहरी हवामानाने होणारे शेतकरी वर्गाचे नुकसान बघता बैलजोडी पाळण्याचा खर्च शेतकरीवर्गाला परवडणारे नसल्याचे शेतकरी सांगतात. आज गावातून बैलजोड्या लुप्त झाल्या असून सर्रास ट्रॅक्टरचा वापर पेरणी व मळणीसाठी सुरू आहे. त्यामुळे बैलजोडीची पेरणी दुर्मीळ झाली आहे. शेतकरी वर्गाचा ओढा हा बैल पाळण्याकडे असला तरी सध्या यंत्राची मदत घ्यावी लागत आहे.