ऐतिहासिक गौरवाबरोबरच नवी जबाबदारी
प्रतापगड :
अफझल खान वधाचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भव्य प्रतापगड किल्ला आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अधिकृतपणे सामील झाला आहे. भारत सरकारने 'Maratha Military Landscape of India' या संकल्पनेअंतर्गत युनेस्कोकडे पाठवलेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये प्रतापगडचाही समावेश होता. हा समावेश महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, तो इतिहास, पर्यटन, स्थानिक रोजगार आणि सांस्कृतिक जतनाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे.
- संभाव्य तोटे व आव्हाने
अती-पर्यटनामुळे पर्यावरणीय ताण : पर्यटकांची अनियंत्रित संख्या परिसरातील जैवविविधता, स्वच्छता, आणि नैसर्गिक पर्यावरणावर ताण निर्माण करू शकते. कचरा, प्लास्टिक व ध्वनी प्रदूषण ही मोठी आव्हाने ठरू शकतात.
स्थानिकांवरील निर्बंध : युनेस्कोच्या संरक्षण धोरणांनुसार बांधकाम, धार्मिक परंपरा, सण-उत्सव आणि उपजीविकेच्या काही मार्गांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे, ज्याचा स्थानिकांच्या जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो.
व्यावसायिकतेचा अतिरेक : अनियंत्रित पर्यटनामुळे परिसरात रिसॉर्ट्स, दुकानं, अन्नगाड्या यांचे अतिक्रमण होऊन किल्ल्याचे सौंदर्य व ऐतिहासिक शांतता धोक्यात येऊ शकते.
- स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या समस्या
अपुरी पायाभूत सुविधा : सध्या प्रतापगड परिसरात स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, रस्ते, पार्किंग व कचरा व्यवस्थापन यांसारख्या सुविधा अप्नुया आहेत. पर्यटन वाढीस सामोरे जाण्यासाठी या सुविधा तातडीने सुधाराव्यात.
स्थानिकांचा सक्रिय सहभाग : योजना यशस्वी होण्यासाठी स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेणे, त्यांचे पारंपरिक हक्क जपणे, आणि पर्यायी उपजीविका प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे : किल्ल्याच्या आसपासच्या भागात अनधिकृत घरं, दुकानं आणि व्यावसायिक स्थळे उभारली गेली आहेत. त्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन प्रशासनासाठी मोठे आव्हान असेल.
जबाबदार पर्यटन आणि जनजागृती : पर्यटकांनी भिंतींवर लिखाण टाळणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, ऐतिहासिक स्थळांचा आदर राखणे यासाठी जनजागृती मोहिमा, पर्यावरणपूरक सूचना आणि सक्त नियमावली गरजेची आहे.
- संवर्धन हीच खरी जबाबदारी
प्रतापगडचा युनेस्को जागतिक वारसा यादीतील समावेश हा केवळ गौरवाचा क्षण नाही, तर महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. हे यश स्थानिकांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे. यामुळे राज्य शासन, पर्यटन विभाग, स्थानिक प्रशासन आणि रहिवासी यांच्यातील सुसंवाद, समन्वय आणि विश्वास अत्यंत महत्वाचा ठरेल. 'गौरवाच्या या पर्वाला विकासाची दिशा देताना, पर्यावरण, इतिहास आणि लोकजीवन यांचे संवर्धन हीच खरी जबाबदारी'.
- युनेस्को मान्यतेमुळे होणारे संभाव्य फायदे
आंतरराष्ट्रीय ओळख आणि पर्यटन वृद्धी युनेस्कोचा दर्जा मिळाल्यानंतर प्रतापगडाची जागतिक पातळीवर ओळख प्रस्थापित होईल. यामुळे देशविदेशातून पर्यटकांचा ओघ वाढेल, ज्याचा थेट फायदा हॉटेल व्यवसाय, होमस्टे, दूर गाइड, हस्तकला व्यवसाय, वाहनसेवा आणि स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यांना होईल. ऐतिहासिक वारशाचे व्यावसायिक संवर्धन युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वांनुसार किल्ल्याचे जतन, देखभाल व नुतनीकरण अधिक व्यावसायिक पद्धतीने आणि जागतिक दर्जाच्या तांत्रिक सहकार्याने केले जाईल. स्थानिक रोजगार आणि आर्थिक संधी नवीन सुविधा, माहिती केंद्रे, पर्यटन मार्गदर्शन सेवा, स्थानिक कलाविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या वाटा उपलब्ध होतील. शिक्षण आणि सांस्कृतिक जपणूक: किल्ल्याशी निगडित ऐतिहासिक घटना, स्थापत्यशास्त्र, युद्धनीती व लोकपरंपरा यांवर आधारित शैक्षणिक कार्यक्रम, माहिती फलक व डिजिटल माध्यमातून जागरूकता वाढवता येईल.