Almatti Dam Height: वडनेरे समितीचा अहवाल मान्य आहे का? MP विशाल पाटलांचा सवाल
महत्वाचे म्हणजे हा अहवाल राज्य शासनाला मान्य आहे का?
सांगली : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या महापुरास कोणकोणते घटक जबाबदार आहेत याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने वडनेरे समितीची स्थापना केली होती. त्या समितीने अलमट्टी धरणाला क्लिन चिट दिली आहे. महत्वाचे म्हणजे हा अहवाल राज्य शासनाला मान्य आहे का. जर असेल तर मग नेमक्या कोणत्या कारणामुळे महापूर येतो.
महापूर येवू नये म्हणून कोणती पर्यायी व्यवस्था शासनाने केली आहे. यंदा दुर्दैवाने पूर आल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदारी कोणावर. तसेच आहे. कर्नाटक की महाराष्ट्र असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे.
खासदार विशाल पाटील म्हणाले, वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटकास पोषक आहे. अलमट्टीमुळे महापूराची स्थिती निर्माण होते हे पुराव्यासह मांडण्यास महाराष्ट्र सरकार कमी पडले. वडनेरे समितीचा जो अहवाल आला आहे त्याच्याविरोधात शासनाने न्यायालयाचा दरवाजाही अद्याप ठोठावलेला नाही.
याचा अर्थच शासनाला बडनेरे समितीचा अहवाल मान्य आहे असा होतो. अलमट्टी विरोधात मी एकटा भांडू शकत नाही यामध्ये शासनाची भूमिकाही महत्वाची आहे. महापूराशी अलमट्टीचा काहीही संबंध नसल्याचे समितीचे म्हणणे असले तरी अलमट्टीची उंची वाढविण्यास सध्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
साहजिकच सध्या तरी उंची वाढणार नाही. बडनेरे समितीचा अहवाल शासनाला मान्य असला तरी आम्हाला नाही. कारण पूरपट्टयातील नागरिकांची अशी भावना आहे की, अलमट्टीमुळेच पुर येतो. त्यामुळे शासनाने पुन्हा समितीचे पुर्नगठन करावे आणि त्या समितीचा अहवाल घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
महापूरास जबाबदार कोण.. कर्नाटक की महाराष्ट्र हे देखील शासनाने जाहीर करावे.राज्य शासनाची पूर नियंत्रण योजना चांगली आहे. परंतु पुराचे पाणी शहरात आल्यावर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा पूराचे पाणी शहरात येवू नये याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे पावसाळ्यात कोयनेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ होते.
पूरपट्ट्यातील बांधकामे हा विषय देखील महत्वाचा आहे. कोयनेतून सोडण्यात येणारे पाणी जर भूमिगत पाईपलाईनची सुविधा करुन आटपाडी, जत तालुक्याकडे बळविले तर ते सोयीचे होणार आहे. याकरिता एकदाच खर्च येईल परंतु यामुळे दुष्काळी पट्टयात पाणी मिळेल. शहरात शिरणाऱ्या पाण्याला देखील प्रतिबंध बसेल
महापुराला आपणच जबाबदार?
खा. विशाल पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाचा आणि पाणी फुगवटा होवून महापूर येतो असे शासनास वाटत नाही. कारण वडनेरे समितीने जो अहवाल दिला आहे त्यामध्ये अलमट्टीमुळे पूर येत नसल्याचे म्हटले आहे. राज्य शासनाला देखील हा अहवाल मान्य आहे.
त्यामुळे उगाचच कर्नाटक शासनाला महापूरा संदर्भात दोष देणे योग्य नाही. याचा दुसरा अर्थ महापुराला राज्य शासन आणि आपणच जबाबदार आहोत असाच निघतो. तसेच असेल तर पूर येवू नये यासाठी शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे हे त्यांनी जाहीर करावे.