For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी द्या

12:10 PM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी द्या
Advertisement

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या बैठकीत मागणी

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव मंडळांना प्रतिवर्षी महानगरपालिका तसेच पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. प्रत्येक वर्षी चलन भरण्यासह इतर किचकट प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्याऐवजी एकदाच पाच वर्षांसाठी मंडळांना परवानगी द्यावी. यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ कमी होऊन त्यांना इतर कामांसाठी वेळ देता येईल, अशी मागणी शहापूर विभाग सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत करण्यात आली. शहापूर विभागीय गणेशोत्सव मंडळांची महत्त्वाची बैठक रविवारी नवी गल्ली शहापूर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते. व्यासपीठावर रमेश सोनटक्के, अशोक चिंडक, नगरसेवक रवी साळुंखे, नितीन जाधव, राजू बिरजे, संजय शिंदे, विजय भोसले, राजू सुतार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वडगाव येथील विसर्जन तलाव ढासळला असून येथे विसर्जन करणे कठीण होत आहे. त्यामुळे शहापूर परिसरात एखादा विसर्जन तलाव उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या, रस्त्यांवरील खड्डे यासह इतर समस्या प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी दूर कराव्यात, अशा सूचना गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. श्रीधर तिगडी, अशोक होसमणी, राजकुमार बोकडे, प्रशांत भातकांडे, बापू जाधव, अमृत भागोजी, रणजीत हावलन्नचे, हिरालाल चव्हाण, अनिल आमरोळे, तानाजी शिंदे यांनी सूचना मांडल्या. यावेळी शहापूर, वडगाव, जुने बेळगाव परिसरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.