अपात्र ठरवलेल्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या
कोल्हापूर :
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 3 व 5 वर्ष एलएलबी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अपुऱ्या हजेरीमुळे अपात्र करण्यात आले आहे. त्यांना पुढील वर्षालाही प्रवेश नाकारला आहे. तरी या विद्यार्थ्यांना त्वरीत प्रवेश द्यावा, या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने शहाजी लॉ कॉलेजसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे, एटीकेटी, कॅरीऑनसारख्या विशेष उपाययोजना असतानाही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना परीक्षा देणे किंवा पुढील वर्गात प्रवेश देणे संदर्भात कोणतीच उपाययोजना केली नाही. विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाया जाणार आहेत. अपात्र सेमिस्टरचे सहा महिने उलटूनही विद्यार्थ्यांना अद्यापही पुढील सेमिस्टरला प्रवेश नाकारला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता कॉलेज प्रशासन आणि संबंधित विभागाने त्यांच्या अधिकारातून योग्य त्या उपाययोजना कराव्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रथमेश कांबळे, डॉ. उल्हास त्रिरत्ने, विजय कौशल, साक्षी पाटील, तृप्ती माने, स्नेहल लावंड, सुजाता पाटील, साहिल शिंदे, रेश्मा गायकवाड, किरण के. के, महेश बावडेकर आदी उपस्थित होते.