Satara News : कापिल गावात बोगस मतदानाचा आरोप ; ग्रामस्थांचे तीव्र धरणे आंदोलन ..!
कापिल गावात बनावट मतदारांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
सातारा : 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कापिल गावात बोगस मतदानाचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे! गावात वास्तव्यास नसलेल्या काही लोकांनी कापिल गावाच्या पत्त्यावर बनावट आधार कार्ड तयार करून मतदान केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या गंभीर प्रकरणावर आज ग्रामस्थांनी एकत्र येत धरणे आंदोलन छेडले आहे.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, साताऱ्यातील कराड तालुक्यातील कापिल गावाशी कोणताही संबंध नसलेल्या लोकांनी येथे मतदान नोंदणी करून मतदान केलं. या बोगस नोंदणीमागे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांची मागणी आहे की, अशा बनावट मतदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच मतदार नोंदणी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कराड यांनी चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी याशिवाय ग्रामस्थांनी संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी कोणताही आदेश नसताना निवडणूक शाखेत काम करत चुकीच्या नोंदी केल्यामुळे त्यांच्यावर निलंबन व खातेनिहाय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
कापिल गावातील हे आंदोलन आता प्रशासनाच्या दारावर पोहोचलं आहे. ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे, बोगस मतदारांवर गुन्हा, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तरच गावातील लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल.