आरोप बिनबुडाचे-राजकीय हेतूने!
महाबळेश्वर पाटील यांची माहिती : हलगा ग्रा. पं. चा कारभार पारदर्शक
खानापूर : हलगा ग्राम पंचायतीत भ्रष्टाचार होत असल्याचे तसेच गटार कामाबद्दल पंचायत सदस्य रणजित पाटील यांनी खोटे आरोप केले. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून हलगा ग्राम पंचायतीत कोणताही भ्रष्टाचार झाला नसून सर्व कारभार पारदर्शकपणे सर्व पंचायत सदस्यांना विश्वासात घेऊनच करण्यात येतो. विकासकामांबाबत सर्वांना समान न्याय देवून प्रत्येक विभागाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. रणजीत पाटील यांनी बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा विकासकामावर भर द्यावा, असे हलगा ग्रा. पं. अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.रणजीत पाटील यांनी मेरडा येथील गटार कामाबाबत चांगले गटार तोडून नव्याने गटार बांधण्यात येत आहेत.
यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना महाबळेश्वर पाटील म्हणाले, मी ऑगस्ट 2023 मध्ये हलगा ग्रा. पं.चा अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. तेंव्हापासून प्रत्येक वॉर्डाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. विकासकामात कोणतीही तडजोड केली नाही. जी विकासकामे केली आहेत. त्याचा दर्जा सर्वांना माहिती आहे. जर माझ्याकडून निप़ृष्ट दर्जाची कामे झाली असल्यास रणजीत पाटील यांनी शासकीय यंत्रणेकडे तक्रार करावी आणि माझी चौकशी करावी. मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. यापूर्वीही लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र त्यातूनही काही सिद्ध झाले नसल्याने राजकीय आकसापोटी रणजीत पाटील हे आरोप करत आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत ग्रा. पं. सदस्य प्रवीण गावडा, उपाध्यक्षा मंदा फठाण, सदस्या इंदिराताई मेदर उपस्थित होत्या.