आमदार विनय कुलकर्णींवर अत्याचाराचा आरोप
बेंगळूर : धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा यांच्या खून प्रकरणात आरोप असलेले धारवाड ग्रामीणचे काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी हे आणखी एका प्रकरणात अडचणीत आले आहेत. महिला शेतकरी नेत्यावर अत्याचार केल्याचा आरोप विनय कुलकर्णी यांच्यावर झाला असून बेंगळूरमधील संजयनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. एका महिलेने आमदार विनय कुलकर्णी यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे. यासंबंधी महिलेने बेंगळूरच्या संजयनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 2022 पासून विनय कुलकर्णी यांच्याशी आपली ओळख आहे. अधूनमधून व्हिडिओ कॉल करून ते असभ्यपणे वागत होते.
24 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या घरी रिक्षातून गेले होते. घरातून निघताना त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवून घेतले. नंतर देवनहळ्ळीनजीकच्या आव्हीसी रोडजवळील निर्जनस्थळी नेले. तेथे कार थांबवून अत्याचार केला. 2 ऑक्टोबर रोजी त्यांनी पुन्हा अत्याचार केला, असा उल्लेख त्या महिलेने तक्रारीत केला आहे. त्यानुसार विनय कुलकर्णी यांच्याविरुद्ध अत्याचार, छळ, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तक्रार दिलेल्या महिलेची बेंगळूरच्या के. सी. जनरल इस्पितळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
आरोपाचा इन्कार
आमदार विनय कुलकर्णी यांनी आपल्यावरील अत्याचाराचा आरोप फेटाळून हा आपल्याविरुद्ध कट असल्याचे म्हटले आहे. केवळ दोन-तीन वेळा झालेल्या व्हिडिओ कॉलच्या संभाषणाच्या आधारे आरोप करण्यात आला आहे. हा आरोप खोटा आहे. काहीजण असा प्रकारचे काम करत आहेत. माझ्याविरुद्ध खटल्यातील साक्षीदारांवर प्रभाव टाकण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आले आहे. या कटामागे कोणाचा हात आहे, हे तपासातून समोर येईल. मी देखील तक्रार केली आहे. आरोप करणारी महिला शेतकरी नेता आहे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन समस्या मांडण्यासाठी येत होती. शेतकऱ्यांना मी साहाय्य केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समोर ठेवून त्या महिलेने व्हिडिओ कॉल केले. त्यावर त्या रिल्स पाठवत होत्या. आमच्यात मागील साडेतीन वर्षांपासून कोणतेही कॉल, संभाषण झालेले नाही. सोडतीन वर्षांपूर्वीचे व्हिडिओ कॉल समोर ठेवून आता आरोप करण्यात आल्याचे आश्चर्य वाटत आहे, असे विनय कुलकर्णी यांनी म्ह्टले आहे.