For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुपा धरणाचे तिन्ही दरवाजे उघडले

10:37 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुपा धरणाचे तिन्ही दरवाजे उघडले
Advertisement

जलविद्युत प्रकल्प 100 टक्के कार्यक्षम : परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Advertisement

कारवार : जिल्ह्याच्या जोयडा तालुक्यातील काळी नदीवरील सुपा (गणेशगुढी) धरणाचे तीनही दरवाजे एक मीटरने उघडून दहा हजार 710 क्युसेक पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारी 12 वा. सुरू करण्यात आला आहे. याशिवाय गणेशगुढी जलविद्युत प्रकल्पातील प्रत्येकी 50 मेगावॅट क्षमतेची दोन जनित्रे शंभर टक्के क्षमतेनुसार कार्य करीत असून या जनित्राद्वारे 4 हजार 538 क्युसेक्स इतके पाणी काळी नदीच्या पात्रात सोडून देण्यात येत आहे. त्यामुळे काळी नदीच्या पात्रात एकूण 15 हजार 293 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी काळी नदीच्या तीरावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. काळी नदीच्या पात्रात मासेमारीसाठी उतरण्यावर, जलक्रिडावर, बोटींगवर आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

सुपा जलाशयातील विसर्गामुळे दांडेलीतील काही भागासह मावंळगी प्रदेश जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तेथे वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुपा धरणाचे पाणलोट क्षेत्र लाभलेल्या जोयडा तालुक्यात बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्याच्या दक्षिण भागात आणि गोवा राज्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसापासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सुपा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील सात दिवस धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येणार आहे. त्याकरीता धरणातील पाण्याची योग्य पातळी टिकवून ठेवण्यासाठी आणि धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंगळवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुपा धरणात 22 हजार 144 क्युसेक्स पाणी वाहून येत आहे.

Advertisement

सुपा धरण 88.20 टक्के भरले

सुपा धरणातील कमाल पाण्याची पातळी 564 मीटर इतकी असून आजअखेर ही पातळी 559.82 मीटर इतकी झाली आहे. धरणातील पाण्याची क्षमता 147.55 टीएमसी इतकी असून आजअखेर जलाशयातील पाणी 126.662 (88.20 टक्के) इतके झाले आहे. ऊर्जा निर्मितीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून बांधण्यात आलेल्या या धरणातील पाण्यावर अंबिकानगर येथील जलऊर्जा प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. अंबिकानगर येथे 135 मेगावॅट क्षमतेची सहा विद्युत जनित्रे आहेत. सुपा धरणातील पाण्याचा वापर पुढे कोडसळ्ळी, कद्रा जलविद्युत प्रकल्पात केला जातो.

Advertisement
Tags :

.