For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले ते ते सर्व कृष्णरूप झाले

06:26 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले ते ते सर्व कृष्णरूप झाले
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

समस्त यादव कुळाला मिळालेल्या ब्राह्मणांच्या शापामुळे, यादव कुळात जन्मलेल्या श्रीकृष्णाच्या शरीराचाही नाश होणार होता आणि ही बाब सर्वांना नकोशी वाटत होती कारण श्रीकृष्णाच्या शरीराचे महात्म्य अपार होते. त्याचे शरीर लोकांच्या डोळ्यांना आल्हाद देत असे. ते पाहताना शिवशंकरांनाही अतिशय आनंद होत असे. त्याच्या अकराही इंद्रियांची सर्वांनाच अवीट गोडी वाटत असे आणि त्यामुळे त्याच्यावर गाढ प्रेम जमत असे. स्त्रिया मग त्या कोणत्याही वयाच्या असोत, त्यांनी एकदा श्रीकृष्णाला बघितले की, त्यांची सकाम नजर श्रीकृष्णावर खिळत असे. परमार्थी आणि विरक्त असलेल्या संतांच्या कानी श्रीकृष्णाची कीर्ती पडली रे पडली की, त्यांच्या चित्तात श्रीकृष्ण मूर्ती ठसलीच म्हणून समजा. जे असंत असतात त्यांनीही कृष्णकीर्ती ऐकली की, त्यांचेही चित्त कृष्णमूर्तीचा आकार धारण करते. जे भक्तिभावाने श्रीकृष्णकीर्ती ऐकतात ते असंत असले तरी संत होतात. ज्या महाकवींनी श्रीकृष्णाच्या कीर्तीचे वर्णन केले त्यांना परम सौभाग्यस्थिती प्राप्त झाली. कृष्णाची कीर्ती जे इतरांना सांगतात त्यांनाही परमसौभाग्याची स्थिती प्राप्ती होते. श्रीकृष्ण कीर्तीच्या कविता तर तिन्ही लोकात परम पावन आहेत. कवीश्वरांची श्रीकृष्णकीर्ति जे ऐकतील त्यांचे श्रीकृष्णाबद्दलचे प्रेम आणि श्रद्धा आणखीनच वाढीला लागतील. तसेच त्यांची श्रीकृष्ण भक्ती पण चढतीवाढती होत राहील. अशी ही श्रीकृष्णकीर्ती अगाध असून त्यांची मूर्ती जे अखंड ध्यानात ठेवतील ते कृष्णरूप होतील. ह्या श्रीकृष्णमूर्तीचे ध्यान त्याच्यावरील प्रेमाने जे करतील ते कृष्णरूप होतील ह्यात काहीच नवल नाही. असं म्हणायचं कारण म्हणजे जे त्याचा द्वेष करायचे तेही द्वेषाने किंवा त्याच्यापासून आपल्याला भय आहे ह्या कल्पनेने सदैव त्याचे ध्यान करायचे. त्यामुळे तेही कृष्णरूप होऊन मुक्त झाले. कंसाने श्रीकृष्णाचा असाच धसका घेतला होता. त्याच्या सतत ध्यानीमनी श्रीकृष्णाचाच विचार असे. तो केव्हा येईल आणि आपला वध करेल हे सांगता येत नाही ह्या विचाराने त्याला असे वाटत होते की, तो कुणाचे ना कुणाचे रूप घेऊन येईल आणि आपल्याला ठार मारेल. ह्या कल्पनेने त्याला प्रत्येकजण कृष्णरूप वाटत असे. त्यामुळे तो सदैव त्या धाकात रहात असे. तीळ तीळ मरणे काय असते त्याचा अनुभव तो अनेक वर्षे घेत होता. त्यामुळे प्रत्येक दिवशी मानसिकरित्या खचत गेल्याने त्याची शक्ती क्षीण होत गेली. योग्यवेळ येताच श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरतेसमयी त्याच्या नजरेसमोर श्रीकृष्ण प्रत्यक्षात हजर होताच आणि त्याचे नाव द्वेषाने का होईना त्याच्या ओठावर होतेच. ह्या सगळ्याचा चांगला परिणाम होऊन श्रीकृष्णाच्या हातून मृत्यू आल्याने त्याचा आपसूकच उद्धार झाला. महाभारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य मेघश्याम श्रीकृष्णाने केले. त्यामुळे पार्थाच्या पराक्रमाला सीमा राहिली नाही आणि शेवटी त्याचा विजय झाला. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना संपूर्ण युद्धभूमीवर त्याचा रथ ते फिरवत होते. त्यावेळी ज्या ज्या योद्ध्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले ते ते सर्व कृष्णरूप झाले. जेथे जेथे श्रीकृष्णाची पावले पडत होती तेथे तेथे चारही मुक्तींचा वावर होत होता. अशी तनु श्रीकृष्णाने कशी त्यागली असेल? का ब्रह्मशापाला भिऊन त्याने आपणहूनच आत्मघात करून घेतला असेल अशी शंका येते. श्रीकृष्णाचा जन्म यादव वंशात झाला होता आणि ब्राह्मणांचा शाप समस्त यादव वंशाला लागू होता. त्यानुसार श्रीकृष्णासह सर्व यादव कुळातील लोकांचा नाश होणे अपेक्षित होते तरच ब्राह्मणांचा शाप सत्य झाला असता.  श्रीकृष्ण परिपूर्ण परब्रह्म होता. त्यामुळे त्याला शापाचे बंधन लागू नव्हते तरीपण ब्रह्मवचन सत्य करण्यासाठी त्याने यादव वंशियांच्या बरोबर स्वत:च्या शरीराचा त्याग केला.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.