कुंडई दरोडाप्रकरणातील पाचही आरोपी गजाआड
पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांची माहिती : दरोड्यातील पाचही दरोडेखोर बिगरगोमंतकीय
मडगाव : कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत 9 ऑक्टोबर रोजी घातलेल्या दरोडा प्रकरणातील पाचही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी काल मंगळवारी सायंकाळी उशिरा मडगाव पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, वास्कोचे निरीक्षक कपिल नायक, कुंकळीचे निरीक्षक डायगो ग्रासियस व अन्य पोलिस उपस्थित होते. पोलिसांना गुंगारा देण्याचा आरोपींनी कसा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न पोलिसांनी कसा हाणून पाडला, याची सविस्तर माहिती सुनिता सावंत यांनी पत्रकारांना दिली.
पाचही दरोडेखोर बिगरगोमंतकीय
मूळ कुडीबाग - कारवार येथील व सध्या मालभाट - मडगाव येथे राहात असलेला अशोक पांढरेकर, आमोणे - केपे येथील आरोपी राजू बसवराज वडार व मांगूर हिल वास्को येथील राम मंदिराजवळील राजू रेगी, वास्को येथील पवन राजभारत यादव तसेच मांगूर हिल-वास्को येथील नागराज मोहन तलवार यांना या दरोडाप्रकरणी अटक करण्यात आलेली असून त्यांनी या दरोड्यात आपला हात असल्याचे मान्य केले आहे.
दीड लाखाची रक्कम लंपास
पाच दिवसांपूर्वी कुंडई औद्योगिक वसाहतीत हे दरोड्याचे प्रकरण घडले होते. मूळ राजस्थान राज्यातील व सध्या कुंडई येथील एका आस्थापनात चतुर्भूज घिंटाल नावाची व्यक्ती सुपरवायझर म्हणून काम करीत होती. त्याच्या मालकाचे नाव चौधरी. दुचाकीवरुन रक्कम नेण्याचे काम हा सुपरवायझर करीत असे. 9 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तो दुचाकीवरुन रक्कम घेऊन जात असताना एका कारमधील दोन व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला करुन त्याच्या दुचाकीतील दीड लाखांची रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी सुपरवायझर व मालकाने म्हार्दोळ पोलिसस्थानकात तक्रार केली होती. या प्रकरणात पाचजण गुंतल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानुसार तपास होऊन पाचही दरोडेखोरांना गजाआड करण्यात आले.
पाचही दरोडेखोर गजाआड
कुंडई औद्योगिक वसाहत ते वरेण्यपुरी -वास्को या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या साहाय्याने तसेच प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे या प्रकरणातील सर्व पाचही आरोपी तपास यंत्रणेच्या जाळ्यात सापडले.
कारवारचा अशोक मुख्य सूत्रधार
मूळ कुडीबाग - कारवार येथील व सध्या मालभाट -मडगाव येथे राहात असलेला अशोक पांढरेकर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे अधीक्षक सुनिता सावंत यांनी यावेळी सांगितले.
दरोडा फक्त दीड लाखाचा, पण गुंतागुत..?
दरोड्याच्या प्रकरणातील लंपास केलेली रक्कम फक्त दीड लाखाची असली आणि पोलिस तपासात ती रक्कम जप्तही करण्यात आलेली असली तरी ज्या पद्धतीने हे अत्यंत गुंतागींतीचे प्रकरण दक्षिण गोवा पोलिसांनी सोडवले ते पाहता या तपासयंत्रणेचे अनेकांनी कौतुक केले.
दरोड्यातील कारला लावली खोटी नंबरप्लेट
या दरोडा प्रकरणात आरोपींनी कारला खोटी नंबरप्लेट लावली होती. त्याचा तपास पोलिसानी लावला. त्यावरुन एका आरोपीला अटक केली तेव्हा तो मी नव्हेच, असा पवित्रा त्या आरोपीने घेतला होता. त्याचाही खोटारडेपणाचा बुरखा पोलिसांनी फाडला आणि या दरोड्यात त्याचा हात होता हे स्पष्ट झाले. त्यानंतर दक्षिण गोव्यातील पोलिसांच्या सांघिक प्रयत्नामुळे कुंकळ्ळी, केपे, मडगाव, वास्को व पुंडई येथपर्यंत फैलावलेल्या या पाचही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्यात यश आले.