For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चकाकते ते सर्व सोने नव्हे...फसवणुकीचे जाळे नवे!

12:19 PM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
चकाकते ते सर्व सोने नव्हे   फसवणुकीचे जाळे नवे
Advertisement

सोनेरी टोळीचा उत्तर कर्नाटकात वावर : पाया खणताना सोने सापडल्याची बतावणी, सावज फसताच रकमेसह पोबारा, सावधगिरी बाळगणे आवश्यक

Advertisement

बेळगाव : बेळगावसह उत्तर कर्नाटकात स्वस्तात सोने देण्याचे सांगून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बागलकोट, कारवार जिल्ह्यातही फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. बेळगाव परिसरात तर गेल्या महिनाभरापासून अनेकांना स्वस्तात सोने घ्या म्हणून फोन येत आहेत. या सोनेरी टोळीविषयी वेळीच सावधगिरी बाळगली नाही तर फसवणूक ही ठरलेलीच. गेल्या आठवड्यात बागलकोट व कारवार जिल्ह्यातील शिरसीजवळ सोने देण्याचे सांगून व्यापाऱ्यांना फसविल्याच्या दोन घटना घडल्या  हेत. बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गिऱ्हाईक शोधण्याचे काम सुरू आहे. सोन्याचा दर वाढला आहे. सराफी पेढ्यांवर त्याचा दर कितीही असला तरी आम्ही 30 लाख रुपये प्रतिकिलोने देण्याचे भामटे सांगू लागले आहेत. शेतजमिनीत खोदाई करताना किंवा नव्या घरासाठी पाया खणताना आम्हाला मोठ्या प्रमाणात सोने मिळाले आहे. त्यामुळे काही विश्वासू माणसांना ते स्वस्तात देणार आहोत, असे सांगत भामटे सावजाला पटवतात. सुरुवातीला एखादा तुकडा खऱ्या सोन्याचा देतात. त्यामुळे साहजिकच भामट्यांवर सावजाला विश्वास बसतो. स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या आशेमुळे त्यांना लाखोंचा गंडा बसतो.

बागलकोट जिल्ह्यातील तुळशीगेरी येथे महाराष्ट्रातील दोघा व तेलंगणामधील एकाची फसवणूक झाली आहे. धर्मपुरी तेलंगणा येथील चंद्रशेखर गोल्लपल्ली व गोंदिया, महाराष्ट्रातील विनोद मेघवानी आणि अमित बदवाल यांना 30 लाख रुपयांना ठकविण्यात आले आहे. जुलै शेवटच्या आठवड्यात भामट्यांनी तेलंगणा येथील चंद्रशेखर यांच्याशी संपर्क साधून मंदिराच्या गाभाऱ्यासाठी पाया खणताना मोठ्या प्रमाणात सोने सापडले आहे, असे सांगितले. चंद्रशेखर यांनी आपल्या दोन मित्रांनाही सोबत घेऊन भामट्यांशी संपर्क साधला. 30 लाख रुपयांना एक किलो याप्रमाणे व्यवहार ठरला. बळ्ळारी जिल्ह्यातील होस्पेटला चर्चा झाली. भामट्यांनी चंद्रशेखर यांना दोन सोन्याची नाणी दिली. सराफाकडून त्याची तपासणी केली असता ती नाणी खरी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर किलोभर सोने खरेदीचा व्यवहार ठरला. 1 ऑगस्टपासूनच व्यवहाराला सुरुवात झाली. महाराष्ट्र, तेलंगणा किंवा बळ्ळारीत व्यवहार नको. बागलकोटमध्ये या, असे सांगत भामट्यांनी चंद्रशेखर व त्यांच्या मित्रांना बागलकोटला बोलावले. 2 ऑगस्ट रोजी कलादगीजवळील तुळशीगेरी येथे बोलावून त्यांना एक किलो सोन्याची नाणी असलेली एक पिशवी दिली. त्यांच्याजवळून 30 लाख रुपये रोकड घेतले. व्यवहार पूर्ण होण्याआधीच ‘पोलीस आले...’ असे सांगत भामट्यांनी 30 लाख रुपयांसह तेथून पळ काढला आहे.

Advertisement

भामट्यांनी 9 लाख 11 हजार पळविले

दुसरी घटना 4 ऑगस्ट रोजी शिरसीजवळील मळगावनजीक घडली आहे. केरळमधील मल्लपुरमचे सचिन शिवाजी गायकवाड या व्यापाऱ्याला स्वस्तात सोने देण्याचे सांगून भामट्यांनी 9 लाख 11 हजार रुपये पळविले आहेत. या घटनेनंतर चार दिवसांत बनवासी पोलिसांनी पाच जणांच्या एका टोळीला अटक करून 7 लाख 63 हजार रुपये रोकड व तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. एक महिन्यापूर्वी एका भामट्याने सचिन गायकवाड यांना 800 मिली सोन्याचा तुकडा दिला होता. हे तपासून बघा, खरे सोने असेल तर आपल्याकडे असले खूप सोने आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. 800 मिलीचा तुकडा खरे सोने निघाले म्हणून केरळमधून सोने खरेदी करण्यासाठी सचिन शिरसीला आले. आरोपींनी सचिन व त्यांच्या दोघा मित्रांना शिरसी-हानगल रस्त्यावरील मळगावला बोलावले.

4 ऑगस्ट रोजी सकाळी 9 लाख 11 हजार रुपये असलेली बॅग घेऊन सोने न देताच भामट्यांनी तेथून पलायन केले होते. यासंबंधी बनवासी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. बागलकोट जिल्ह्यातील तुळशीगेरी येथे घडलेल्या घटनेचा मात्र अद्याप छडा लागला नाही. बेळगाव, कारवार, बागलकोट, विजापूर, हुबळी-धारवाडसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात बनावट सोने किंवा स्वस्तात सोने विकण्याचे सांगून सावजांना लुटणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. उपलब्ध माहितीनुसार बेळगाव परिसरातील अनेक धनिकांना गेल्या महिनाभरापासून सोने खरेदीसाठी विचारणा होऊ लागली आहे. पायाखोदाई करताना आमच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने सापडले आहे. 30 लाख रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करायला तयार असाल तर व्यवहार ठरवा, विश्वास नसेल तर एखादा तुकडा फुकट घेऊन जा, असा निरोप देण्यात येत आहे. या भामट्यांवर विश्वास ठेवून व्यवहार केल्यास फसवणूक होणार, हे निश्चित आहे.

स्वस्तात सोने देण्याचे सांगून फसवणूक

स्वस्तात सोने देण्याचे सांगून फसवणुकीचे प्रकार काही नवे नाहीत. या प्रकारांमागे शिमोगा, दावणगेरी, बळ्ळारी, होस्पेट, हागरी बोम्मनहळ्ळी परिसरातील गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत. सावजांना विश्वास पटावा यासाठी खरे सोने देऊन नंतर किलोचा व्यवहार ठरवण्यात येतो. मोठी रक्कम घेऊन ‘पोलीस आले, पळा!’ अशी ओरड करीत भामटे तेथून निघून जातात. उत्तर कर्नाटकात या भामट्यांचा संचार वाढला आहे.

Advertisement
Tags :

.