महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अष्टपैलू......... कल्पिता नाईक

06:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : केवळ एका क्रीडाप्रकारावर समाधान न मानता आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर विविध खेळावर प्रभुत्व मिळवून मडगाव कालकोंडा येथील 19 वर्षीय कल्पिता श्रीराम नाईक हिने राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांत आपलं नाव रोशन केले आहे. महिला नूतन हायस्कूल, नावेलीतील रोझरी उच्च माध्यमिक स्कूल आणि आता रोझरी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कल्पिताने आतापर्यंत हँडबॉल, तायक्वांदो, ज्युदो, जिम्नॅस्टीक आणि पॉवरलिफ्टींग आणि क्रॉस कंट्रीत या खेळावरील आपले वर्चस्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. 2015मध्ये आपली ‘स्पोर्ट्स जर्नी’ आणि शिक्षण महिला नूतन स्कूलमधून सुरूवात केलेल्या कल्पिताचा आवडता विषय म्हणजे क्रीडा. तिला नेहमीच शालेय, उच्च माध्यमिक तसेच कॉलेज पातळीवर क्रीडा शिक्षकांचे तसेच ती खेळत असलेल्या प्रशिक्षकांचे नेहमीच साहाय्य मिळाल्याचे ती गर्वाने सांगते.

Advertisement

हँडबॉल हा खेळ तिला नेहमीच आवडायचा. वडील श्रीराम नाईक हे एक उत्कृष्ट हँडबॉलपटू. त्यांनी गोव्याचे राष्ट्रीय हँडबॉलमध्ये सब-ज्युनियर ते सीनियरपर्यंत गोव्याचे दहा वर्षे राष्ट्रीय स्पर्धांत प्रतिनिधीत्व केलेले. त्यामुळे या खेळाकडे कल्पिताची ओढ साहजिकच. कल्पिताने हँडबॉल खेळावर लहानपण लक्ष्य केंद्रीत केले आणि तिने प्रतिनिधीत्व केलेल्या संघाने 2016मध्ये राज्य सब-ज्युनियर हँडबॉल स्पर्धेत ब्राँझपदकही मिळविले. हँडबॉल खेळातीत आपल्या प्रभुत्वाला कल्पिता नेहमीच आपले प्रशिक्षक कॉसेंसाव फर्नांडिस व विनय सांबारी आणि गोवा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांना देते. कल्पिताने आतापर्यंत सब-ज्युनियर ते सीनियर पातळीवरील राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धांत तसेच 34व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हँडबॉल क्रीडाप्रकारात गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.
Advertisement

हँडबॉल खेळाव्यतिरिक्त कल्पिता नंतर 2018 मध्ये जिम्नॅस्टीक खेळात आली व तिने आपल्या पहिल्याच स्पर्धेत राज्यपातळीवर पहिले स्थानही मिळविले. ग्रासरूट पातळीवर लानलायमा देवी यांचे कुशल प्रशिक्षण मिळालेल्या कल्पिताला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धांत आपलं कसब दाखविण्याची संधीही मिळाली आहे. सध्या जिम्नॅस्टीक खेळावर कल्पिताने आपलं लक्ष केंद्रीत केलं असून भविष्यात जिम्नॅस्टीक खेळातील एक उत्कृष्ट प्रशिक्षिका बनण्याची तिची मनिषा आहे. कुठल्याही क्षेत्रात वरचढ व्हायचे असले, तर घरातील प्रत्येक सदस्यांचा आणि प्रामुख्याने पालकांचा पाठिंबा आणि सहकार्य नेहमीच मोलाचं असतं. मला माझे पालक श्रीराम नाईक तसेच रमिला नाईक आणि आजी अन्नपूर्णा गावस यांनी माझे खेळांच्या क्षेत्रात नेहमीच पाठिंबा दिला आहे. या कारणास्तव मी माझं शिक्षण आणि खेळ यांचा सांगड व्यवस्थितपणे घालू शकले व शकते असे कल्पिता म्हणाली.

जिम्नॅस्टीक या खेळाचा प्रसार आता गोव्यात प्रभावीपणे होऊ लागला आहे. कल्पिता ही आता या खेळातील प्रिलिमीनरी प्रशिक्षक असून यासाठी ती गोवा जिम्नेस्टीक संघटनेचे अध्यक्ष सुदेश ठाकूर यांचे आभार मानते. सध्या कल्पिता फातोर्ड्यात साग जिम्नॅस्टीक सेंटर, नावेलीत पर्पेच्युअल जिम्नॅस्टीक सेंटर व मडगावात मडगाव स्पोर्ट्स अकादमीत प्रशिक्षण देत आहे. कल्पिताने आपण एक मल्टी टेलंटेड क्रीडापटू असल्याचे वेळावेळी सिद्ध केले आहे. हँडबॉल आणि जिम्नॅस्टीक्स या खेळांच्या व्यतिरिक्त कल्पिताने गोवा विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतर कॉलेज पातळीवरील तायक्वांदो स्पर्धेत वैयक्तिक तसेच रोझरी कॉलेजचे प्रतिनिधीत्व करताना सांघिक जेतेपदही मिळविले आहे. ज्युडोतही आपलं कसब दाखविताना कल्पिताने यंदा मिळविलेले ब्राँझपदक हे तिच्या विविध खेळातील वर्चस्व सिद्ध करून जाते.

महाराष्ट्रातील नागपूरात झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करताना दाखविलेली कामगिरी तसेच आगरतळा येथे झालेल्या जिम्नेस्टीक स्कूल नॅशनलमधील मिळविलेले स्थान कल्पिताचे या खेळांतील राज्यातील तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्थान अधोरेखीत करणारे आहे. पॉवरलिफ्टींगमध्येही राष्ट्रीय पातळीवर कल्पिताने प्रतिनिधीत्व केले असून बेंगलोरात झालेल्या सब-ज्युनियर राष्ट्रीय महिला क्लासिक बेंच प्रेस अजिंक्यपद स्पर्धेत तिने 63 किलो वजनीगटात पाचवे स्थान मिळविले. मडगावच्या दामोदर कॉलेजने आयोजित केलेल्या आंतर कॉलेज पातळीवरील रॉ पॉवरलिफ्टींग स्पर्धेत मिळविलेले पहिले स्थान हे तिच्या पॉवरलिफ्टींग खेळात असलेले प्रभुत्वही सिद्ध करून जाते.

गोवा अॅथलेटीक संघटना आणि गोवा विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतर कॉलेज पातळीवरील क्रॉस कंट्री स्पर्धेत रोझरी कॉलेजचे प्रतिनिधीत्व करताना मिळविलेली सांघिक तिसरी स्थाने ही सुद्धा कल्पिताच्या ‘मल्टी टेलंटेड स्पोर्ट्स वुमन’ या किताबाची हकदार ठरते. कल्पिताने क्रीडा संदर्भात केलेल्या अविस्मरणीय कामगिरीच्या व्यतिरिक्त तिने शैक्षणिक पातळीवर केलेल्या कामगिरीची दखलही कित्येक सेवाभावी संघटनांनी घेतली असून तिला बारावीच्या बोर्ड परीक्षेत 94.33 टक्के गुण मिळाल्याने रोझरी उच्च माध्यमिक स्कूल, दी भंडारी कॉ-ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्याकडून गौरविण्यात आले असून स्पोर्ट्समधील उल्लेखनीय कामगिरीसाठी श्रीकृष्ण मंदीर देवस्थान, दिया ऑर्गनायझेशन आणि नारी शक्ती महिला मंडळातर्फेही गौरविण्यात आले आहे.

विविधांगी कल्पिता नाईकची क्रीडा प्रकारातील कामगिरी

हँडबॉल खेळातील कल्पिता

तायक्वांदो खेळातील कल्पिता

ज्युडो खेळातील कल्पिता

जिम्नॅस्टीक्स खेळातील कल्पिता

 भारताचे प्रतिनिधीत्व

पॉवरलिफ्टींग खेळातील कल्पिता

-संदीप मो. रेडकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article