हिवाळी अधिवेशनाची सर्व तयारी पूर्ण
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती : कामाचा घेतला आढावा
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाची सर्व तयारी करण्यात आली असून गेल्यावर्षीपेक्षा यंदा अधिक चांगल्यारितीने अधिवेशन पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यंदाच्या अधिवेशनकाळात आंदोलने कमी होतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून विविध संघ-संस्थांशी चर्चा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आगामी अधिवेशनात सुवर्णसौध आवारात सभाध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकाविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेऊन ते पत्रकारांशी बोलत होते. रोशन म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून साडेचार कोटी रुपये अनुदानातून सुवर्णसौध परिसरात भव्य पार्क निर्माण करण्यात आले आहे. याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी मंत्री, आमदार, अधिकारी व इतर मान्यवरांसाठी सरकारी इमारती, खासगी हॉटेल्समधील 3 हजार खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच 700 वाहनेही राखीव ठेवण्यात आली असून कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
अधिवेशनासाठी 7 ते 8 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 3 कि. मी. पर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून आंदोलनासाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यावर स्वत: पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कमीतकमी आंदोलने होतील, असा आपला विश्वास असून आपण व पोलीस आयुक्त विविध संघ-संस्थांबरोबर चर्चा करत आहे. राज्य सरकारने ऊस व मका पिकाला योग्य भाव दिला असून विविध समस्याही मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे यंदा आंदोलने कमी होतील, असा आपला मानस असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदाच्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्या व विकासाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच विविध विषयांवर चर्चा करून समस्या निवारण्यात येणार असून आंदोलन करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. आंदोलन करण्याला आपला आक्षेप नसून आंदोलनकर्त्यांनी आपली संपूर्ण रूपरेषा जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे देणे आवश्यक आहे. तसेच आंदोलनासाठी परवानगी बंधनकारक करण्यात आली असून विनापरवाना आंदोलनावर बंदी आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद उपस्थित होते.