सर्व पदांची भरती आयोगामार्फत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : कर्मचारी भरती आयोग कार्यालयाचे उद्घाटन
पणजी : यापुढे सर्व सरकारी पदांची भरती गोवा कर्मचारी भरती आयोगातर्फे करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या पाटो - पणजी येथील कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. सावंत बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, आयोगामुळे सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता आली असून भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या परीक्षेचा निकाल लागलीच कळतो. त्यामुळे वशिलेबाजीचा प्रश्नच येत नाही. संगणकावरील आधारित परीक्षा आणि लगेच निकाल मिळत असल्यामुळे निवड प्रक्रिया पारदर्शक झाल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे.
राजकीय हस्तक्षेप नाही
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी सरकारी नोकरीत पारदर्शकतेचा अभाव होता आणि त्यावरुन सरकारवर वारंवार टीका व्हायची. तसेच राजकीय हस्तक्षेपही होत असे. आता संगणकामुळे कोणताही हस्तक्षेप होत नाही आणि उमेदवारांची निवड पूर्णपणे पात्रतेनुसार करण्यात येते, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
कार्यालय तंत्रज्ञानाने सज्ज
पाटो - पणजी येथील ‘स्पेस’ इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर हे कार्यालय असून ते पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. परीक्षेसाठी स्वतंत्र संगणक विभाग, सीसीटिव्ही यंत्रणा, दिव्यांग विशेष सुविधा, ऑनलाईन यंत्रणा व व्यवस्थापन तेथे समाविष्ट करण्यात आले आहे. कोणतेही सरकारी खाते स्वतंत्रपणे भरती प्रक्रिया करणार नाही. सर्व पदांची भरती आयोग करणार असून तसा स्पष्ट आदेशही सरकारने जारी केल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
752 पदांसाठी जाहिरात
आयोगाने आतापर्यंत 752 सरकारी पदांसाठी जाहिराती देऊन भरती प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच आयोगामार्फत 50 पदांची भरती करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. जुन्ता हाऊसमधील सरकारी कार्यालये इतरत्र स्थलांतरित करण्यात येणार असून दोन वर्षांनी जुन्ता हाऊसची पुन्हा उभारणी झाल्यानंतर तेथे ती कार्यालये पुन्हा स्थानापन्न होतील तसेच काही खात्यांसाठी नवीन प्रशस्त कार्यालये देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आयोगाचे अध्यक्ष व मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, सचिव शशांक ठाकूर, कर्मचारी भरती आयोगाचे सदस्य नारायण सावंत, दौलत हवालदर व आयोगाचे इतर सदस्य त्यावेळी उपस्थित होते.