धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट
बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चलो मुंबईचा नारा दिला आहे. मुंबई येथील विधान भवनासमोरील धरणे आंदोलनाला महाराष्ट्रातील नागरिकांचा पाठिंबा मिळावा या उद्देशाने रविवारी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी कोल्हापूर येथे सर्वपक्षीय नेते मंडळीची भेट घेतली. मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथील नागरिकांचा पाठिंबा कसा मिळविता येईल याविषयी चर्चा करण्यात येईल. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप, मराठा महासंघ, काँग्रेस तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने खटल्याला बळकटी मिळत नसल्याची तक्रार वेळोवेळी म. ए. समितीने केली आहे. महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेऊन सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात करण्याची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात केली जाणार आहे. रविवारी कोल्हापूर येथील शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजय देवणे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, अंकुश पाटील, किसन लाळगे यासह इतर सदस्य उपस्थित होते.
मंत्री अबिटकर यांची गारगोटी येथे भेट
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांची गारगोटी येथे रविवारी सायंकाळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. अधिवेशन काळात कोणत्या दिवशी आंदोलन करणे उचित ठरेल. तसेच तेथे सर्व पक्षांचा सीमाप्रश्नासाठी कसा पाठिंबा मिळेल या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. अबिटकर यांना सीमाप्रश्नाबाबत सविस्तर माहिती असल्याने आपण या आंदोलनाला उपस्थित राहू, असे त्यांनी सांगितले.