सर्व नसरल्लाह मारले जावेत!
हिजबुल्लाह प्रमुखाच्या मृत्यूवर हेमंत शर्मांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ पलवल
हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या विरोधात इस्रायलने युद्ध पुकारले आहे. काही दिवसांपूर्वी हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह हा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारला गेला होता. आता या युद्धाचे पडसाद हरियाणा विधानसभा निवडणुकीतही उमटत आहेत. पलवलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी हिजबुल्लाह प्रमुखाचा उल्लेख केला. देवाने इस्रायलला आणखी शक्ती द्यावी असे शर्मा यांनी म्हटले आहे.
इस्रायलने हिजबुल्लाह प्रमुखाचा खात्मा केला, परंतु काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेत इस्रायलने असे का केले असे विचारत आहेत. आमचे सैनिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा होतात तेव्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या तोंडून अवाक्षरही निघत नाही. हिजबुल्लाहचा प्रमुख मारला गेल्यावर मात्र काँग्रेसला अश्रू अनावर होतात अशी टीका हेमंत शर्मा यांनी केली आहे.
दहशतवाद संपुष्टात यावा अशीच मी कामना करतो. देवाने इस्रायलला आणखी शक्ती द्यावी. पूर्ण दहशतवाद संपविण्यासाठी इस्रायलला देवाने शक्तिशाली करावे. दहशतवादाची पाठराखण करणाऱ्यांनाही संपविण्याची गरज आहे. देशविदेशात असलेले सर्व नसरल्लाह संपुष्टात यावेत असे भाजप नेत्याने म्हटले आहे.
काँग्रेसच्या एका नेत्याने उमेदवारी अर्ज भरताना पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली होती. भाजपने पुन्हा सरकार स्थापन केल्यावर अशा नेत्यांना तुरुंगात डांबले जाणार आहे. राहुल गांधी हे अलिकडेच आसाममध्ये आले होते. त्यावेळी 600 मदरसे बंद का केले अशी विचारणा त्यांनी केली होती. आता तर 600 मदरसे बंद केले आहेत, पुढील काळात सर्व मदरसे बंद करणार असल्याचे शर्मा यांनी पंचकूला येथील जाहीर सभेत म्हटले होते.
देशाला डॉक्टर, इंजिनियर हवेत
देशात मदरशाचे शिक्षण आम्हाला नको. आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर हवे आहेत. काँग्रेसने देशाच्या कानाकोपऱ्यात छोटेमोठे बाबर पाळले आहेत. अयोध्येत बाबर राज संपले असून रामराज्य सुरू झाले आहे. आता या छोट्या मोठ्या बाबरांना देशातून बाहेर काढायचे असल्याचे वक्तव्य हेमंत विश्व शर्मा यांनी केले होते.