गोव्याच्या हृदयात सामावलाय अवघा भारत!
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे गौरवोद्गार : 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता,228 पदकांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर,गोव्याची 92 पदकांची भरारी, नवव्या स्थानी
पणजी : गोव्यात पहिल्यांदाच झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन इवल्याशा गोव्याने निटनेटकेपणाने, यशस्वीरित्या केल्याने गोवेकर कौतुकास पात्र आहेत. गोवा राज्य देशात लहान असले तरी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरीलही स्पर्धा घेण्या एवढ्या क्रीडाविषयक साधनसुविधा निर्माण करून गोव्याने अन्य राज्यांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. गोवा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद राज्य आहे. गोव्याच्या हृदयातच संपूर्ण भारत सामावलाय, असे गौरवोद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काढले. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी उषा, क्रीडामंत्री गोविंद गावडे, राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, क्रीडा खात्याच्या संचालक स्वेतिका सचन, डॉ. गीता नागवेकर, आयुक्त अरविंद खुटकर आदी उपस्थित होते.
केंद्राकडून खेळांसाठी भरीव कार्य
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, 2036 मध्ये भारत देश ऑलिम्पिक स्पर्धेचे नेतृत्व करणार आहे. याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. खेळाचा स्तर उंचावा आणि देशात एकापेक्षा एक सरस खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी केंद्रातील भाजप सरकारने खेळासाठी भरीव कार्य केलेले आहे. देशात आर्थिक सुबत्ता यावी आणि इतर राष्ट्रांसोबतची स्थिती मजबूत व्हावी, यासाठी मोदी सरकारने देशाची आर्थिक घडी बसवली आहे. कोविडसारख्या संकट काळातही देश डगमला नाही, उलट भारताने जगाला लस दिली. एवढे मोठे कार्य आपल्या देशाने केले.
गोव्याचे यश पदकांवरुन दिसते : गावडे
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी गोव्याच्या खेळाडूंचे कौतुक केले. विरोधकांनी या स्पर्धेबाबत टीका केली असली तरीही स्पर्धेचा लाभ राज्याला आणि खेळाडूंना किती प्रमाणात झाला हे गोव्याने मिळवलेल्या पदकांवरून दिसून येते, असेही ते म्हणाले.
पदकतालिकेत गोवा नवव्या स्थानी
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत गोव्याने 92 पदकांसह 9वे स्थान मिळविले आहे. गोव्याच्या खेळाडूंनी एकूण 43 पैकी 39 क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतला होता. तब्बल 27 सुवर्ण, 27 रौप्य आणि 38 कास्य अशी एकूण 92 पदके जिंकली. स्काय मार्शल आर्ट्समध्ये गोव्याने सर्वाधिक 10 सुवर्णपदके जिंकली, या खेळाने गोव्यासाठी सर्वाधिक म्हणजे 27 पदकेही जिंकली.
महाराष्ट्र 228 पदकांसह प्रथम स्थानी
महाराष्ट्राच्या सर्वांत मोठ्या म्हणजे 761 खेळाडूंचा समावेश असलेल्या बलाढ्या संघाने 228 पदकांसह प्रथम क्रमांक पटकावला. 38 वी क्रीडा स्पर्धा आता उत्तराखंड राज्यात होणार आहे.
सर्व सरकारी खात्यांमध्ये खेळाडूंना आता मिळणार 4 टक्के आरक्षण
गोवा सरकारच्या सर्व खात्यांमध्ये यापुढे चार टक्के नोकऱ्या क्रीडा व्यक्तींसाठी राखीव असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी केली. सध्या फक्त पोलीस विभाग आणि अग्निशामक दलात क्रीडा व्यक्तींसाठी असे आरक्षण आहे. परंतु यापुढे सर्व खात्यांमध्ये खेळाडूंना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला जाईल. राज्यात खाजगी क्रीडा विद्यापीठ उभे राहावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचा लाभ खेळाडूंना झाला असून, गोव्याने सुमारे 92 पदके मिळवून गोव्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले. गोव्यात या स्पर्धेदरम्यान निर्माण झालेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा वापर वर्षभर स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी केला जाईल, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.